मोहाडीत निधीअभावी घरकूल लाभार्थी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:00 AM2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:31+5:30
केंद व राज्य शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मोहाडी येथील १४६ नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या अटी शर्तीनुसार घराच्या पायव्याचे काम पूर्ण केल्यावर पहिला हप्ता, सज्जा लेव्हलपर्यंत बांधकाम केल्यावर दुसरा हप्ता व घराच्या स्लॅब पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता, प्लास्टर व बांधकाम पूर्ण झाल्यावर शेवटच्या हप्त्याचे धनादेश दिले जातात.
सिराज शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : ‘सर्वांना घरकूल’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना निधीच्या कमतरतेमुळे मोहाडी येथे रखडली असून केंद्र शासनाचा निधी मिळालेला नसल्यामुळे अनेक घरकुल धारकांच्या अडचणीत वाढ झालेली असून त्यांनी उधारीवर घेतलेला लोहा, सिमेंट, विटा आदी बांधकाम साहित्य पुरविणारे आता पैशासाठी त्यांच्याकडे तकादा लावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या हद्याचे ठोके वाढलेले आहेत.
केंद व राज्य शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मोहाडी येथील १४६ नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या अटी शर्तीनुसार घराच्या पायव्याचे काम पूर्ण केल्यावर पहिला हप्ता, सज्जा लेव्हलपर्यंत बांधकाम केल्यावर दुसरा हप्ता व घराच्या स्लॅब पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता, प्लास्टर व बांधकाम पूर्ण झाल्यावर शेवटच्या हप्त्याचे धनादेश दिले जातात. घरकूल बांधकाम करणारे गरीब वर्गातील असतात, त्यामुळे बांधकामासाठी ते पूर्णपणे शासनाच्या निधीवर अवलंबून असतात. बांधकाम लवकरात लवकर पूर्ण झाल्यावर आपल्याला पैसे लवकर मिळतील व उधारीचे पैसे आपण लवकर चुकते करू या आशेने सर्वच घरकुल धारकांनी युद्धपातळीवर घराचे बांधकाम पूर्ण केले.
बांधकामासाठी लागणारा लोहा, सिमेंट, विटा, रेती उधारीवर आणल्या गेली. तर बांधकाम मजुरांचे पैसे देण्यासाठी काहिनी कर्जसुद्धा काढले. या आशेवर की बांधकाम पूर्ण होताच शासनाचे पैसे मिळतील आणि सर्वांचे पैसे देता येईल.
परंतु मागील दोन ते तीन महिन्यापासून केंद्र शासनाचा निधी आलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरकुल धारकांचे हप्ते अडलेले आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
केंद्राचा निधी म्हाडाकडे
प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी नगर पंचायतीला म्हाडाकडून उपलब्ध होतो. निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी मोहाडी नगर पंचायतीतर्फे अनेकदा म्हाडाकडे पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु मागील तीन-चार महिन्यांपासून म्हाडाकडून केंद्राच्या निधी प्राप्त झालेला नाही असे नगरपंचायतीचे म्हणणे आहे.घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडले व ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणे त्यांना गरजेचे आहे. प्रती घरकुल २ लक्ष ५० हजार रुपये प्रमाणे मंजूर घरकुलांना देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रती घरकुल १ लक्ष रुपये, तर केंद्राकडून १ लक्ष ५० हजार रुपये दिले जातात. यासाठी राज्य शासनाकडून ५८ कोटी ४० लक्ष प्राप्त झाले आहे. मात्र केंद्र शासनाकडून निधी मिळालेला नाही.
स्वत: जवळील व उसणवारी घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. लोकांचे पैसे देणे असल्यामुळे ते पैशाचा तगादा लावत आहेत. घरकुलाचे दोन हप्ते मिळाले. नगर पंचायतीच्या दररोज चकरा मारूनही बाकीचे हप्ते मिळालेले नसल्याने उधारी साहित्य देणाऱ्यांचा तगादा वाढला आहे.
-जितेंद्र हेडाऊ, घरकूल लाभार्थी, मोहाडी.
घरकुलाचे हप्ते तीन महिन्यांपासून मिळालेले नसल्यामुळे व काही बांधकाम साहित्य उसणवारीवर घेतले असल्यामुळे घरकुलाचे बांधकाम नाईलाजास्तव थांबवावे लागले.
-लीलाधर धार्मिक, घरकूल लाभार्थी, मोहाडी.