कसे आहात, ठीक आहे, दोन शब्द आप्तांचे देतात दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:01+5:302021-05-07T04:37:01+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे कठीण झाले. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने अनेकांचे जिवलग हिरावले. कुणाचे सर्वस्व गेले. दररोज अप्रिय घटना कानावर पडत आहेत. आज त्याचा मृत्यू झाला, काल अगदी जवळचा मित्र गेला. कुणाचा पती तर कुणाचा वडील कोरोनाच्या करालदाढेत गेला. कोरोना एवढा निष्ठुर की अगदी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्याही अंत्यसंस्काराला जाणे दुरापास्त. अशा या भयभीत वातावरणात स्वत:ची काळजी घेत आप्तस्वकीयांची ख्यालीखुशाली विचारली जात आहे.
दररोज कुणाचा ना कुणाचा फोन येतो. कसे आहात एवढे दोन शब्द सुरुवातीलाच विचारले जाते. ठीक आहे, असे शब्द कानावर पडले की, दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटतात. कुणी सर्दी, पडसे, ताप आहे असे सांगितले की, काळजीच्या स्वरात लवकर टेस्ट करून घे, दवाखान्यात जा, असा सल्ला देतात. कुणी नातेवाईक रुग्णालयात दाखल असेल तर त्याची ख्यालीखुशाली विचारली जाते. अनाहूतपणे कुणाचा फोन आला तर दोन क्षण मनात चर्र होते. समोरचा काय सांगेल याची चिंता त्याचे दोन शब्द कानी पडेपर्यंत लागलेली असते. अशा वातावरणात आज प्रत्येक जण चिंतेत दिसत असून आप्तस्वकीयांच्या ख्यालीखुशालीने चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणत कोरोना कधी संपेल, याची प्रतीक्षा करीत आहे.