कसे आहात, ठीक आहे, दोन शब्द आप्तांचे देतात कोरोना संकटात दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 05:00 AM2021-05-07T05:00:00+5:302021-05-07T05:00:45+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे कठीण झाले. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने अनेकांचे जिवलग हिरावले. कुणाचे सर्वस्व गेले. दररोज अप्रिय घटना कानावर पडत आहेत. आज त्याचा मृत्यू झाला, काल अगदी जवळचा मित्र गेला. कुणाचा पती तर कुणाचा वडील कोरोनाच्या करालदाढेत गेला.
ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आज हा गेला, काल शेजारच्याचा मृत्यू झाला, तो आयसीयुमध्ये भरती आहे. अशा वार्ता चोहोबाजूंनी कानावर पडत आहेत. कसे आहात, ठीक आहे, हे आप्तस्वकीयांचे दोन शब्द कोरोना संकटात दिलासा देतात. कोरोना महामारीच्या तांडवाने समाजमन भयभीत झाले आहे. प्रत्येक जण एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे कठीण झाले. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने अनेकांचे जिवलग हिरावले. कुणाचे सर्वस्व गेले. दररोज अप्रिय घटना कानावर पडत आहेत. आज त्याचा मृत्यू झाला, काल अगदी जवळचा मित्र गेला. कुणाचा पती तर कुणाचा वडील कोरोनाच्या करालदाढेत गेला. कोरोना एवढा निष्ठुर की अगदी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्याही अंत्यसंस्काराला जाणे दुरापास्त. अशा या भयभीत वातावरणात स्वत:ची काळजी घेत आप्तस्वकीयांची ख्यालीखुशाली विचारली जात आहे.
दररोज कुणाचा ना कुणाचा फोन येतो. कसे आहात एवढे दोन शब्द सुरुवातीलाच विचारले जाते. ठीक आहे, असे शब्द कानावर पडले की, दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटतात. कुणी सर्दी, पडसे, ताप आहे असे सांगितले की, काळजीच्या स्वरात लवकर टेस्ट करून घे, दवाखान्यात जा, असा सल्ला देतात.
कुणी नातेवाईक रुग्णालयात दाखल असेल तर त्याची ख्यालीखुशाली विचारली जाते. अनाहूतपणे कुणाचा फोन आला तर दोन क्षण मनात चर्र होते. समोरचा काय सांगेल याची चिंता त्याचे दोन शब्द कानी पडेपर्यंत लागलेली असते. अशा वातावरणात आज प्रत्येक जण चिंतेत दिसत असून आप्तस्वकीयांच्या ख्यालीखुशालीने चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणत कोरोना कधी संपेल, याची प्रतीक्षा करीत आहे.
भंडारा जिल्ह्यात महिनाभर कोरोनाचे तांडव सुरू होते. अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. आजही अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुसरीकडे रुग्णालयात बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी अनेकांनी पायपीट केली आहे. अशा परिस्थितीतून जात असताना गत चार दिवसांपासून थोडा दिलासा मिळत आहे. रुग्ण संख्या घटत आहे. घटती रुग्ण संख्या पाहून समाधानाची लकेर चेहऱ्यावर उमटत आहे. या कोरोनाने एकमात्र केले आप्त स्वकीयांना संकटाच्या काळात एकत्र आणून संवाद वाढविला.