ज्याच्यावर एकही गुन्हा नाही तो गावगुंड कसा? सुनील मेंढे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 04:54 PM2022-01-22T16:54:20+5:302022-01-22T16:54:48+5:30
Bhandara News काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बाजू सावरून घेण्यासाठी उमेश घरडे या व्यक्तीला तथाकथित मोदी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकही गुन्हा नाही, तो गावगुंड कसा, असा सवाल खासदार सुनील मेंढे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बाजू सावरून घेण्यासाठी उमेश घरडे या व्यक्तीला तथाकथित मोदी ठरविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला जात आहे. एकही गुन्हा नाही, तो फारसा गावातही राहत नाही, असा गोंदीचा उमेश घरडे गावगुंड कसा, असा सवाल खासदार सुनील मेंढे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जेवनाळा येथे प्रचारादरम्यान मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. खासदार सुनील मेंढे यांनी या संदर्भात १७ जानेवारी रोजी भंडारा ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. आपण आंदोलन केले, रीतसर तक्रार दिली, परंतु गांभीर्याने दखल घेतली नाही. पोलीस त्यांना पाठीशी घालत आहे. पोलीस सरकारच्या दबावात गुन्हा दाखल करीत नसल्याचे खासदार मेंढे यांनी सांगितले. बनावट मोदीला पैशाचे लालच देऊन उभे करण्यात आले असल्याची शंका नाकारता येत नसल्याचेही ते म्हणाले.
चित्रफितीत नाना पटोले यांच्या बोलण्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच असल्याचे स्पष्ट होते. पंतप्रधानांबाबत त्यांनी एकेरी उल्लेख केला. त्यांच्याच प्रचाराला साकोली येथे पंतप्रधान आले होते. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानानांच उद्देशून वक्तव्य केले. मात्र, आता दिशाभूल करण्यासाठी तथाकथित मोदी पुढे आणला जात आहे, ही दिशाभूल असून नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
आम्ही न्यायालयीन लढाई लढू
पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असे खासदार मेंढे यांनी सांगितले. नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावर बेड्या ठोकल्या. या सरकारला मुख्यमंत्र्यांचा आदर आहे, परंतु पंतप्रधानांचा आदर नाही, असेच गुन्हे दाखल न करण्याच्या प्रकारावरून दिसते.