कृषी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्रशासनाला आणखी किती बळी हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:49+5:302021-04-11T04:34:49+5:30
संतोष जाधवर भंडारा: राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात जानेवारीपासून विविध विभागाच्या अनेक शासकीय ...
संतोष जाधवर
भंडारा: राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात जानेवारीपासून विविध विभागाच्या अनेक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे; मात्र भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एकाही कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लस मिळालेली नाही. त्यामुळेच की काय, जिल्ह्यात अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत तीन कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे; मात्र तरीही जिल्हा प्रशासन कृषी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही असा आरोप कृषी सहायक संघटना तसेच महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघाने केला आहे.
कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणात गत अनेक दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून दुजाभाव करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध योजनांची अंमलबजावणी, तसेच शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत असल्याने जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने लसीकरण करावे, यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी पत्रव्यवहार केला आहे; मात्र याकडेही आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पोलीस, आशा वर्कर, ग्रामपंचायतीच्या शिपायांनाही कोरोना लस दिली आहे; मात्र कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी अजूनपर्यंत वंचित आहेत. त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाला अजून किती जणांचा बळी हवा आहे, आमचा जीव गेल्यावर आम्हाला लस दिली जाणार का असा संतप्त सवाल कर्मचारी विचारत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी लाखनी तालुक्यातील एका कृषी सहायकाचा वेळेत उपचार न मिळाल्याने कोरोनाने मृत्यू झाला होता, त्यानंतर मोहाडी तालुक्यात एका निवृत्त सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक व शनिवारला पुन्हा एका कर्तव्यावरील कृषी पर्यवेक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
बॉक्स
कामासाठी कृषी विभाग मग लसीकरणासाठी का नाही
जिल्हा, तालुका प्रशासनाला कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवडणूक, नुकसानभरपाईची कामे,पंचनामे, कोविड काळातील कर्तव्य निभावण्यासाठी आठवण होते मग कोरोना लसीकरणासाठी आठवण झाली नसेल का असाही प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे आधी आम्हाला लसीकरण करून द्या मगच आम्ही कामे करतो, असे कर्मचारी म्हणत आहेत. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचा अथवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला आरोग्य विभागच जबाबदार असेल असा इशाराही कृषी सहायक संघटनेने दिला आहे.
बॉक्स
कृषी मंत्री, कृषी आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली
जिल्ह्यात २०२१ च्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. त्यातच गतवर्षी लॉकडाऊन कालखंडातही अनेक कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. पुराच्या वेळी आपला जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना मदत, मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षणासोबतच मतदानाचे काम कृषी कर्मचारी यांनी आपले कर्तव्य निभावले आहे; मात्र तरीही कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीपासून डावलले जात असल्याने स्वतः कृषीमंत्री दादा भुसे तसेच कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना कृषी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस द्यावी यासाठी पत्र दिले आहे; मात्र तरीही या पत्राला जिल्हा प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे कृषी कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
कोट
विविध कामांसाठी कृषी कर्मचाऱ्यांचा अनेक शेतकऱ्यांशी, विविध विभागाच्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क येतो. त्यामुळे धोका वाढला आहे. अनेक कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांंना कोरोनाची लागण झाली तर काही निष्पाप कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने कृषी कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण केले पाहिजे.
आनंद मोहतुरे, जिल्हा सचिव,
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ.
कोट
विविध योजनांची अंमलबजावणी करताना कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतावर,गावस्तरावर अनेकदा भेटीगाठी द्याव्या लागतात. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लसीकरणाबाबत पत्रव्यवहार केला आहे. राज्यस्तरावरून कृषी आयुक्तांनीही पत्र दिले आहे. मी स्वतः आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करीत आहे.
हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा
कोट
शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरणाचे काम सुरु आहे. कृषी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची यापूर्वी माहिती उपलब्ध नव्हती; मात्र सोमवारपासून कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन त्वरित सुरु केले जाईल.
डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी,भंडारा.