व्हॅक्सिनविना तिसरी लाट रोखणार तरी कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:45+5:302021-05-13T04:35:45+5:30
इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात प्राणवायू ...
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात प्राणवायू प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऑक्सिजन बेडनिर्मितीची प्रक्रिया सुरू आहे; परंतु जिल्ह्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचा तुटवडा उद्भवला आहे. परिणामी, व्हॅक्सिनविना तिसरी लाट रोखणार तरी कशी, असा सवाल आपसूकच निर्माण झाला आहे.
जिल्हा प्रशासन याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, जोपर्यंत लसीचा साठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत नागरिकांना लस कशी देणार, असाही प्रश्न जिल्हा प्रशासनाला सतावत आहे. संभावीत तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटींपेक्षा तीव्र राहणार असल्याचे मत आधीच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेदरम्यान कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजनटंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे.
याशिवाय प्रत्येक तालुक्यातही प्राणवायूनिर्मिती प्रकल्प कार्याला गती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आगामी संकट टाळण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने अदानी समूह हा प्लांट उभारणार असून, तीन महिन्यांत तो कार्यान्वित होणार आहे. जवाहरनगर येथील आयुध निर्माणित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची मागणी आता होऊ लागली आहे. मात्र, आता व्हॅक्सिनचा तुटवडा मोहिमेत मोठी अडचण निर्माण करणार आहे.
वारंवार मागणी करूनही शासनाकडून नाममात्रच लस उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला नियोजन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय लसीकरण मोहिमेची गतीही मंदावली आहे. कोविडची तिसरी लाट भंडारा जिल्ह्यावर ओढवण्यापूर्वी जिल्ह्याला मुबलक लससाठा मिळून देण्यासाठी प्रशासन गंभीर असले तरी जे लसीकरणासाठी इच्छुक आहेत, अशांना लस उपलब्ध होत नाही, अशी बाब दिसून येत आहे.
विषम परिस्थितीतही कोरोनायोद्ध्यांची सुमार कामगिरी
प्रकृती खालावलेल्या रुग्णाला तातडीने कोविड रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले जात आहे.
संशयितांसह कोरोनाबाधितांच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करून त्यांची तासातच कोविड चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.
चाचणी केलेल्या व्यक्तीची कोविड चाचणी अहवाल येईपर्यंत त्याला गृहअलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. लक्षणविरहित, तसेच काेविडची सौम्य लक्षणे असलेल्यांना गृहअलगीकरणात, तर कोविडची गंभीर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
विषम परिस्थितीतही कोरोनायोद्ध्यांची कामगिरी ही जिल्हा आरोग्य प्रशासनाची जमेची बाजू ठरली आहे. सोयी-सुविधांवर भर देत, आलेल्या तक्रारींवरही लक्ष दिले जात आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
लसअभावी मोहीम ठरतेय नावालाच
१८ ते ४४ आणि ४५ पेक्षा जास्त वयोगटातील किती लाभार्थ्यांना कोविडची लस द्यावी लागेल, याची माहिती आरोग्य विभागाने शासनाला पाठविली आहे. काही दिवसांपासून नाममात्र लससाठा जिल्ह्याला मिळाल्याचे दिसून येते. कृती दलाच्या बैठकीतही लसीच्या उपलब्धतेवर चर्चा करण्यात आली. ४५ वर्षांवरील १ लाख ६७,९८२ नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३५ हजार ४०२ इतकी आहे. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या वायल या केवळ या वयोगटाकरिता राखीव ठेवल्या आहेत.
लसीबाबत समाजमाध्यमांवर उलटसुलट पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत. त्यावर विश्वास न ठेवता लस घ्यावी. लस सुरक्षित असून, कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. १८ ते ४४ वयोगटासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, लसीच्या उपलब्धतेअभावी या गटाचे लसीकरण शासनाच्या सूचनेनुसार तूर्तास थांबविण्यात आले आहे.
-संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा