21 धान खरेदी केंद्रांवर कशी होणार नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 10:49 PM2022-10-08T22:49:07+5:302022-10-08T22:50:50+5:30
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात केवळ २१ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांवर आता नोंदणीचे काम सुरू आहे. गत खरीप हंगामात २०७ केंद्रांवर खरेदी करण्यात आली होती. त्यावेळीही अनेक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी त्रास सहन करावा लागला होता. आता तर जिल्ह्यात केवळ २१ च केंद्रांना मंजुरी आहे. त्यातही १५ ऑक्टोबरपर्यंतच नोंदणीची मुदत असल्याने जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांची सहा दिवसांत नोंदणी कशी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ऑनलाइन नोंदणीची मुदत १५ ऑक्टोबर असून, अवघ्या सहा दिवसांत दीड लाख धान उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी कशी होणार? असा प्रश्न आहे. त्यातच आता शेतकऱ्याचा लाईव्ह फोटो घेणे बंधनकारक केल्याने आधारभूत केंद्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
धान खरेदी सुरळीत व्हावी, शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जावा यासाठी पणन महासंघाने अनेक अटी व शर्ती आधारभूत केंद्र चालकांवर लादल्या आहेत. आता तर नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदी केंद्रांवर जाऊन लाईव्ह फोटो अपलोड करावा लागणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात केवळ २१ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांवर आता नोंदणीचे काम सुरू आहे. गत खरीप हंगामात २०७ केंद्रांवर खरेदी करण्यात आली होती. त्यावेळीही अनेक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी त्रास सहन करावा लागला होता. आता तर जिल्ह्यात केवळ २१ च केंद्रांना मंजुरी आहे. त्यातही १५ ऑक्टोबरपर्यंतच नोंदणीची मुदत असल्याने जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांची सहा दिवसांत नोंदणी कशी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्रांना समस्यांचा सामना करावा लागतो. शासनाचे संकेतस्थळ वारंवार बंद पडते. एखादा फोटो अथवा कागदपत्र अपलोड करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. अशा स्थितीत नोंदणी करणे कठीण जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
प्रामाणिक संस्थांवर अन्याय
गतवर्षी जिल्ह्यात २०७ धान खरेदी केंद्रांना खरेदीची मान्यता देण्यात आली होती. मात्र, यावेळेस २१ केंद्रांना का परवानगी देण्यात आली, असा प्रश्न विचारला जात आहे. गतवर्षी धान खरेदी झालेल्या गैरप्रकारामुळे यावर्षी पणन महासंघ खरेदी केंद्रांची चाचणी करूनच परवानगी देत आहे. मात्र, यात अनेक प्रामाणिक संस्था भरडल्या जाण्याची शक्यता असल्याचे पालांदूर येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे यांनी सांगितले.
नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता
- कोणत्याही परिस्थितीत दीड लाख शेतकऱ्यांची सहा दिवसांत नोंदणी होणे शक्य नाही. त्यामुळे या नोंदणीला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचे पणन महासंघाच्या सूत्राने सांगितले.