‘स्वच्छ भारत’ कसा होईल?

By admin | Published: January 31, 2015 12:34 AM2015-01-31T00:34:05+5:302015-01-31T00:36:03+5:30

देशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात असताना एसटी महामंडळाने अद्याप ती राबविली की नाही, असा प्रश्न बसेसमधील अस्वच्छता पाहून पडतो.

How will 'clean India' be? | ‘स्वच्छ भारत’ कसा होईल?

‘स्वच्छ भारत’ कसा होईल?

Next

देवानंद नंदेश्वर / प्रशांत देसाई भंडारा
देशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात असताना एसटी महामंडळाने अद्याप ती राबविली की नाही, असा प्रश्न बसेसमधील अस्वच्छता पाहून पडतो. बसेसमध्ये अस्वच्छता, सीट फाटलेल्या, खुलेआम धूम्रपान केले जात असल्याने प्रवाशांचा जीव गुदमरतो. परंतु, त्यानंतरही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना हव्या त्या सुविधा देत असताना एसटी महामंडळ मात्र आहे ती स्थिती सुधारण्यास तयार नसल्याने महामंडळाला तोटा सहन करण्याची वेळ आली आहे.
'शहर असो वा गावखेडे' तेथे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबून आहे. तिकिटाचे दर वाढले म्हणून कुरकुर करणारा सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटी बसला प्राधान्य देतो. मात्र बरेचदा त्याचाही येथील गैरसोयीमूळे नाईलाज होत असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात अवैध वाहतूक फोफावली अशी ओरड सर्वच स्तरातून केली जाते. याला बऱ्याच अंशी एसटी महामंडळाचा कारभारच जबाबदार असल्याचे दिसते. ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसकडे कोणाचे लक्ष नाही. या बसमधून प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येतात. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची नियमित स्वच्छताच केली जात नाही. गाडीमध्ये साचलेल्या घाणीमुळे अगदी जीव नकोसा होतो. अनेकांना तर ही दुर्गंधी सहन होत नसल्याने सातत्याने उलट्या होतात.
बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरुवात होते. खिडक्या या उलटीने माखलेल्या असतात. वेफर्स, चिप्स खाऊन त्याचे पॅकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात.
बसमध्ये मोठ्याप्रमाणात माती साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच मनसोक्त धुम्रपान करता दिसतो. गर्दीने खचाखच भरलेल्या गाडीमध्ये हा धूर कोंडल्याने सर्वांनाच धूम्रपान घडते. हा प्रकार थांबविण्याची तसदी गाडीतील वाहक कधीच घेत नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणेही कायद्याने निषिध्द आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही.
बसमध्ये बसून धूम्रपान केले अथवा थुंकले, कचरा टाकला म्हणून कोणालाही आजपर्यंत दंड झाला नाही. त्यामुळे प्रत्येक जण बेफामपणे कोणाचीही पर्वा न करता एसटी बस रंगविण्याचे काम प्रवासादरम्यान करतो. कर्तव्यावर असलेल्या वाहकाने पुढाकार घेऊन अशा प्रवाशांची तक्रार केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार करवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, वाहक अशी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळेच लोकवाहिनी असलेली एसटीबस आज घाणीच्या विळख्यात सापडली आहे.
शिवाय बसच्या तुटक्या सीट, फुटलेल्या खिडक्या ही तर नित्याचीच बाब झाली आहे. आज सर्वत्र स्वच्छतेचा नारा दिला जात असताना एसटी महामंडळाला अजून तरी जाग आलेली दिसत नाही. एसटीसाठीसुद्धा स्वतंत्र स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. बसेसच्या स्वच्छतेची जबाबदारी ही महामंडळाप्रमाणेच प्रवाशांवरही अवलंबून आहे. नियमित स्वच्छता झाल्यास प्रवासीसुद्धा बस अस्वच्छ करण्यास मागेपुढे पाहील. त्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Web Title: How will 'clean India' be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.