जिल्ह्याला भरली हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:53 PM2018-12-17T22:53:54+5:302018-12-17T22:54:56+5:30
ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे.
शनिवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. रविवारी पावसाळी वातावरण तयार होऊन दुपारी १२ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरीला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत रिमझीम पाऊस बरसत होता. त्यातच बोचरा वारा वाहत होता. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रचंड थंडी निर्माण झाली होती. घराबाहेर निघणारा प्रत्येक जण उबदार कपडे घालूनच बाहेर पडत होता. शहरातील विविध भागात भर दुपारी शेकोट्या पेटल्याचे दृष्य होते. ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या होत्या. या अकाली पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. थंडीचा सर्वाधिक त्रास वृद्धांना होत असून सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पाऊस बरसला. या पावसाने भाजीपाला आणि रबी पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. रबी पीके पिवळी पडू लागली आहेत. पालांदूर परिसरात रबीतील उडीद, मुग, लाखोरी आदी पिकांना या अवकाळी पावसाचा लाभ होणार असला तरी बागायतदार शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी ठरत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाने विदर्भात हलक्या पावसाने हजेरी लावली. मंगळवारपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
पावसाळी वातावरणात आधारभूत केंद्रावर धान उघड्यावर
पावसाळी वातावरणात आधारभूत केंद्रावर धान उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतरही बाजार समितीने कोणत्याही सुविधा पुरविल्या नाही. जिल्ह्यातील ६७ पैकी बहुतांश केंद्रांवर सध्या धान उघड्यावर असून शेतकरी आपला धान झाकण्याची धडपड करीत आहेत. भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर धानाची खरेदी सुरु आहे. त्यात भंडारा तीन, मोहाडी नऊ, तुमसर १५, लाखनी ११, साकोली १२, लाखांदूर १२ आणि पवनी तालुक्यातील पाच केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर शेतकºयांना मूलभूत सुविधा पुरविण्याची सर्व जबाबदारी बाजार समित्यांची आहे. त्याबाबत पणन महासंघाने त्यांना पत्रही पाठविले. परंतु जिल्ह्यातील कोणत्याही बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही. विक्रीच्या प्रतिक्षेत असलेले धान ठिकठिकाणी उघड्यावर आहेत. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊन सोमवारी जिल्ह्यात हलका पाऊस झाला. यामुळे आधारभूत केंद्रात उघड्यावर असलेले धान पुन्हा ओले होण्याची भीती निर्माण झाली आहे. गत आठवड्याचा अनुभव बघता शेतकरी आपला धान झाकण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र बाजार समिती या शेतकऱ्यांना कोणतीही सुविधा देत नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धानाची दुप्पट खरेदी झाली असून आधारभूत केंद्रावर धान साठविण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गोदामही अपुरे पडत आहेत. परिणामी धान खरेदीची गती मंदावली आहे. अनेक शेतकरी १५ ते २० दिवस धान विक्रीच्या प्रतिक्षेत या ठिकाणी दिसून येतात.