खरिप उत्पादनात भारी घट, बळीराजा झाला कंगाल !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:34 AM2024-11-19T11:34:17+5:302024-11-19T11:35:46+5:30

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा : भविष्यातील तरतुदीचा प्रश्न कायम

Huge decline in Kharip production, Baliraja became poor! | खरिप उत्पादनात भारी घट, बळीराजा झाला कंगाल !

Huge decline in Kharip production, Baliraja became poor!

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
जिल्ह्यात यंदाच्या खरिपात सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड झाली; परंतु प्रारंभापासून निसर्गाने शेतकऱ्यांची साथ सोडली. पूरपरिस्थिती व अतिवृष्टीने शेतीतील पिकांचे कंबरडे मोडले. उरली कसर कीड व रोगांच्या आक्रमणांनी पूर्ण केली. परिणामी धानाचा उतारा कमालीने घटला आहे. शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. कमी उत्पन्नातून झालेला खर्च कसा काढावा आणि भविष्याची तरतूद कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 


जिल्ह्यात खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांची धान कापणी व मळणीही जोमात सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मळणी आटोपल्या आहेत, त्यांचा धानाचा उतारा पायाखालची जमीन सरकविणारा ठरला आहे. एक एकरातून किमान १६ ते २५ पोती धानाचा उतारा यायला हवा होता. पण, यावर्षी केवळ ७, ८ व ९ पोती धानाचा उतारा येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.


शेतकरी कंगाल, कर्ज परतफेडीचे संकट 
यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी पुरता नागविला गेला आहे. आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम करताना उचल केलेले शासकीय तसेच खासगी कर्ज कसे फेडावे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. घरी कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी धानाची पिसाई करावी की पूर्ण विकून पुढे मजुरी करावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.


लष्करी अळी व रोगांमुळे झाली वाताहात 
जिल्ह्यातील हलके, मध्यम प्रकारच्या धानाची कापणी आणि मळणी सुरु असताना भारी धानावर लष्करी अळीने थैमान घातले. परिपक्च अवस्थेतील भारी धानाच्या लोंबांचा सडा जमिनीवर पडला. उरली सुरली कसर तुडतुडा व अन्य रोगांनी पूर्ण केली.


एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर 
यावर्षी शेतकऱ्यांचा धानाचा उतारा कमालीने घटला आहे. आर्थिक संकटाने शेतकरी खचले आहेत. मशागतीपासून पहे भरणी ते रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणीपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च झाला; मात्र एवढा खर्च करूनही उत्पन्न केवळ १० ते १५ हजारांचे हाती लागत आहे. एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर आल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.


"यावर्षी एकरी २० पेक्षा अधिक धानाचे उत्पादन होणार, अशी स्थिती होती. मात्र, पीक परिपक्वतेच्या अवस्थेत लष्करी अळीने घात केला. त्यातच विविध रोगांच्या आक्रमणाने प्रत्यक्षात एकरी ८ ते १० पोतीच धान झाले. झालेला खर्चही यातून निघण्याची शक्यता नाही. मी आणि माझे कुटुंब चार महिने शेतात काम केले, त्याचा हिशेबच नाही." 
- गौरीशंकर राऊत, शेतकरी, पांजरा (बोरी)

Web Title: Huge decline in Kharip production, Baliraja became poor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.