अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:52+5:302021-05-22T04:32:52+5:30
डावा कालवाअंतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी चुल्हाड आणि बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातील शेत शिवारात वितरण करण्यात आले आहे. चांदपूर ...
डावा कालवाअंतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी चुल्हाड आणि बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातील शेत शिवारात वितरण करण्यात आले आहे. चांदपूर जलाशयअंतर्गत चार हजार हेक्टर आणि सिंचन सुविधाने तीन हजार हेक्टर शेती ओलिताखाली आणण्यात आली आहे. उन्हाळी धान पिकांची लागवड या शेतीत करण्यात आली आहे. उन्हाळी धानाची लागवड करताना शेतकरी आनंदीत होते. अनेक वर्षांनंतर डावा कालवाअंतर्गत पाणी मिळाले होते. पाणी वितरण सुरू असताना शेतकऱ्यांनी नहरावर रात्र जागून काढली. विक्रमी उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांनी आगेकूच केली होती. ऐन धान कापणीच्या हंगामात चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. उभे धान जमिनीवर लोळले, धानाच्या लोंब्या जमिनीला झाले. फक्त तनीस असल्याचे दिसून येत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवले आहे. शेतकऱ्यांचे नियोजन एका क्षणात समाप्त झाले आहे. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा चर्चा होत आहेत. लोकप्रतिनिधींच्या भलत्याच शिवारात भेटी सुरू आहेत. सिहोरा परिसरात चक्रीवादळाने धान व आंब्याचे उत्पादन गेले आहे. माय-बाप शासनाने साधे सर्वेक्षणाचे आदेश दिले नाहीत. यामुळे सानुग्रह मदतीची अपेक्षा भंगली आहे. असे झाले तरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुणी जाब विचारत नाहीत. परंतु नुकसानग्रस्तांच्या मनात खदखद आहे. एका जिगरबाज नेत्यांकडून मोठया अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या बोलण्याची प्रतीक्षा शेतकरी व उत्पादकांना आहे. शब्द आणि निर्णयात वजन असल्याचे सर्वांना माहीत आहे. दरम्यान, सिहोरा परिसरातील नागरिक, शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून संकट अनुभवत आहेत. कोरोना विषाणूच्या लाटेने रोजगार हिरावला आहे. अवकाळी पावसाने शेत शिवारातील उत्पादन गिळले आहे. घरा-घरात चित्त आणि चिंतन सुरू झाले आहे. घरात बसून असल्याने तिजोऱ्या रिकाम्या झाल्या आहेत. गावातही रोहयोचे कामे नाहीत. यामुळे जीवनाचा उदरनिर्वाह अडचणीत असल्याचे दिसून येत आहेत. शासनाने मदतीची उभारी देऊन शेतकऱ्यांना तारले पाहिजे, असा एकच सूर गावात आहे.
बॉक्स
रोजगार देणारे शेतकरी अडचणीत :
ग्रामीण भागात खऱ्याअर्थाने गावातील महिला व पुरुष मजुरांना शेतकरीच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करीत आहेत. खरीप व रब्बी हंगामात रोजगाराचा कालावधी आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव संकट असताना सामाजिक सुरक्षा अंतरचे भान ठेवत गावातील मजुरांना रोजगार दिला आहे. रोहयोच्याबाबतीत ग्रामपंचायतींनी कानावर हात ठेवल्यानंतर खऱ्याअर्थाने शेतकरीच धावून आले आहेत. याशिवाय बिडी उद्योगानेही गावातील कामगारांची आर्थिक अडचण दूर केली आहे. परंतु मजुरांना तारणाऱ्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने हाल हाल केले आहे. सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.