मानव मिशनची बस येते सकाळी, शाळा भरते दुपारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 06:00 AM2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:18+5:30
मानव विकास योजनेमार्फत मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील ३९ शाळांमधील सुमारे ९७८ मुली मानव विकास बसद्वारे तुमसर - बेटाळा, तुमसर -हरदोली -आंधळगाव, तुमसर - आंधळगाव -कांद्री, तुमसर - किसनपूर, तुमसर -खडकी, तुमसर - बोंडे, तुमसर - धोप -आंधळगाव या मार्गावरील शाळेत येत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मानव विकासअंतर्गत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस सकाळी धावू लागल्या आहेत. तथापि, काही शाळा दुपार सत्रात भरतात. त्यामुळे मुलींना दुपारच्या शाळेत लांब अंतरावरून पायपीट करीत शाळेत यावे लागत आहे. तथापि सर्व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात सुरू करण्यात यावा, अशी मागणी मोहाडी मुख्याध्यापक संघाने केली आहे.
मानव विकास योजनेमार्फत मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील ३९ शाळांमधील सुमारे ९७८ मुली मानव विकास बसद्वारे तुमसर - बेटाळा, तुमसर -हरदोली -आंधळगाव, तुमसर - आंधळगाव -कांद्री, तुमसर - किसनपूर, तुमसर -खडकी, तुमसर - बोंडे, तुमसर - धोप -आंधळगाव या मार्गावरील शाळेत येत असतात. मार्च महिन्यापासून तुमसर बस स्थानकवरून मानव विकास योजनेच्या बसेस मुलींना शाळेत आणण्यासाठी सकाळी येत आहेत.
मोहाडी तालुक्यात दहावीचे परीक्षा केंद्र असणाऱ्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरत आहेत. त्यामुळे काही मुख्याध्यापकांनी तुमसर आगार प्रमुखांना सकाळ सत्रात बस सुरू करण्याची मागणी केली. त्या विनंतीनुसार सकाळ सत्रात बसेस येत आहेत. काही ज्या शाळेत परीक्षा केंद्र नाहीत अशा बहुतेक शाळा दुपार सत्रातत भरत आहेत. त्यामुळे मुलींना शाळेत येण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. मानव विकास योजनेच्या बसेस सकाळी सुरू करण्यात आल्या याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. मानव विकास बसच्या दळणवळणबाबत शिक्षण विभाग व तुमसर आगार प्रमुख संवादाचा अंतर पडल्याने काही शाळेतील मुलींच्या शाळेत येण्याजाण्या प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. प्रत्येक शाळांतील शिक्षक केंद्र संचालक, सहायक केंद्रसंचालक, सहायक परीरक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षण करण्यासाठी दहावीच्या पेपरच्या दिवशी शिक्षक जात आहेत. तसेच मार्च महिन्यात वेगवेगळे प्रशिक्षण होत आहेत. याचा प्रभाव शाळांवर पडला आहे. या समस्येविषयी शिक्षण विभागाला कल्पना आहे. असे प्रश्न निर्माण झाले अनेक शाळा सकाळ की दुपारच्या सत्रात सुरू ठेवायच्या या कोंढीत सापडले आहेत. तरी सर्व माध्यमिक शाळा सकाळ पाळीत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे कडे केली आहे. गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांचे मार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक भंडारा यांना मुख्याध्यापक संघ अध्यक्ष गोपाल बुरडे, सचिव राजू बांते, राजू भोयर, सहसराम गाडेकर, अतुल बारई, सिंधू गहाने, कमल कटारे, सुनीता तोडकर, दिगंबर राठोड, यशोदा येळने, विनोद नागदेवे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.