सकारात्मकतेतच मानव कल्याण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:33 PM2018-10-10T21:33:38+5:302018-10-10T21:34:08+5:30
विज्ञानाच्या अविष्कारातून नवनवे तंत्र विकसीत होऊन मानव जीवन कल्याणकारी होत असले तरी मानवांपुढील व जगापुढील आव्हाने मोठी आहेत. नियोजनपूर्वक व सकारात्मक दृष्टीकोनातून होणाऱ्या संशोधनातून त्यावर तोडगा काढणे सहज शक्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : विज्ञानाच्या अविष्कारातून नवनवे तंत्र विकसीत होऊन मानव जीवन कल्याणकारी होत असले तरी मानवांपुढील व जगापुढील आव्हाने मोठी आहेत. नियोजनपूर्वक व सकारात्मक दृष्टीकोनातून होणाऱ्या संशोधनातून त्यावर तोडगा काढणे सहज शक्य आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात देशाच्या हितासाठी कार्य करण्याचा संकल्प मनात आणून उच्च शिक्षण घेऊन संशोधन क्षेत्रात कार्य करावे, असे आवाहन व्हीएनआयटीच्या डॉ.अनुपमाकुमार यांनी केले.
स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतर्फे विज्ञान मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी)चे माजी उपसंचालक डॉ.आर.एस. चौधरी होते. विश्वेश्वरय्या प्रौद्योगिक संस्था (व्हीएनआयटी.)च्या डॉ.अनुपमाकुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे प्रभारी प्राध्यापक डॉ.एल.पी. नागपुरकर यांनी केले. विज्ञान मंडळाच्या अंतर्गत वर्षभरातील विविध उपक्रमांची रुपरेषा, स्वरुप व विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत विकासाच्या दृष्टीने त्यांचे महत्व पटवून दिले.
डॉ.अनुपमाकुमार म्हणाल्या, विद्यार्थी जीवनात शिक्षणाचे शाश्वत मुल्य समजून घेणे व राष्ट्रीय संस्थांमधून उच्च शिक्षण घेऊन संशोधन कार्यात स्वत:ला समर्पीत करणे म्हणजे खरा राष्ट्रीय धर्म आहे.
विज्ञानातील क्षेत्र विस्तारीत असून जीवन जरी सुखमय व आनंदी वाटत असेल तरी अनेक आव्हाने आपल्या पर्यावरणापुढे व मानवी जीवन जगण्यापुढे आहेत. तेव्हा सकारात्मक दृष्टीकोन व नियोजबद्ध सशोधनाद्वारे यावर तोडगा काढणे शक्य आहे, असे प्रतिपादन केले. तरुण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण घेऊन स्वत:चे शरीर निरोगी ठेवून मनाची प्रसन्नता व एकाग्रता वाढविणे शक्य होते असा आग्रह केला.
डॉ.आर.एस. चौधरी म्हणाले, महानगरामध्ये प्रदूषणाचे स्तर मोठे आहे. मोकळा श्वास घेणे व जीवन निरोगी व आनंदी ठेवणे अशक्य आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात संशोधनातून यावर उपाययोजना करणे अशक्य नाही व तरुणांनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनद्वारे दिल्ली शहराच्या प्रदूषणाची व्यथा व मानवाच्या जगण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांचा आढावा दिला. डॉ.अनुपमाकुमार यांनी प्रेझेंटेशनच्याद्वारे बॅटरीच्या पर्यावरणातील प्रदूषणाची व्यथा व त्यावर उपाययोजना या दिवशी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. युवकांना शाश्वत पर्यावरणासाठी शिस्तीने कार्य करण्याचे आवाहन केले.
प्राचार्य डॉ.हरिश त्रिवेदी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यक्तीमत्व विकासासाठी महाविद्यालय सदैव तत्पर आहे व आपल्याला लाभलेल्या व्यक्तीमत्वाच्या ज्ञानाचा फायदा घेऊन आपले जीवन ज्ञानाने समृद्ध करावे असे सांगितले. याप्रसंगी भिंतीचित्र प्रदर्शनीचेही आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर जवळजवळ ११० भिंतीचित्रे प्रदर्शीत केली.
पाहुण्यांचा परिचय प्रा.अमीत जगीया व प्रा.राजीव मेश्राम यांनी केला. संचालन शिवांशी रानपरिया व साक्षी जगीया हिने केले. आभार प्रदर्शन मयूरी शेंडे हिने केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.