मानवता हाच खरा धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:32 AM2021-01-22T04:32:19+5:302021-01-22T04:32:19+5:30
लाखांदूर : समाजातील भांडण, तंटे, छळ संपायला पाहिजे. निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही. याची संपूर्ण काळजी समाजातील प्रत्येक नागरिकांनी ...
लाखांदूर : समाजातील भांडण, तंटे, छळ संपायला पाहिजे. निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही. याची संपूर्ण काळजी समाजातील प्रत्येक नागरिकांनी घ्यावी. चारित्र्यवान समाजनिर्मितीसाठी महापुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासून सर्वांनी परस्परांशी माणुसकीने वागणे गरजेचे असून मानवता हाच खरा धर्म असल्याचे मत प्रवचनकार गजानन सुरकर महाराज यांनी व्यक्त केले.
लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने २३ जानेवारीपर्यंत आयोजित ग्रामगीता प्रवचन कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते.
प्रवचनकार गजानन सुरकर महाराज म्हणाले, भारतीय संस्कृतीचे पालन करताना एकमेकांप्रति आदर बाळगणे महत्त्वाचे आहे. माणूस समाजशील प्राणी असून या समाजाचे ऋण फेडण्याचे मोठे आव्हान सर्वांना पेलायचे आहे. त्यासाठी प्रत्येक माणसाने समाजात जीवन जगताना महापुरुषांचे विचार अंगीकारून माणुसकीच्या नियमाचे पालन करणे म्हणजेच धर्म होय, असेदेखील ते म्हणाले.
तथापि समाजातील उपेक्षितांना महापुरुषांच्या विचारधारेच्या मुख्य प्रवाहात आणणे व दुखितांची सेवा हीच खरी सेवा असल्याचे सांगून मानवता हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवांतर्गत कुडेगाव येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत २१ ते २३ जानेवारी रोजी ग्रामगीता प्रवचन केले जाणार आहे. सदर प्रवचन हभप गजानन सुरकर महाराज करीत असून या महोत्सवांतर्गत गावात नियमित सामुदायिक ध्यान, प्रार्थना, रामधून, भजन, कीर्तन, स्वच्छता यासह अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचा समारोप २३ जानेवारी रोजी गोपालकाला कार्यक्रमाने केला जाणार आहे. या तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य गुरुदेव भक्त महिला पुरुष व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.