आयुष्यमानपासून शेकडो वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:45 AM2019-06-03T00:45:40+5:302019-06-03T00:46:40+5:30
देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी अजूनही या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी वेटींगमध्ये आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी अजूनही या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी वेटींगमध्ये आहेत. विशेष म्हणजे आठ वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात अनेक कुटुंबीयांची नावे यादीत नसल्याने त्या कुटुंबीयांवर या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
आयुष्यमान भारत योजना २५ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने देशभरात लागु केली होती. या अंतर्गत देशभरातील १० कोटी कुटुंबीयाना किंवा ५० कोटी नागरिकांना वर्षाकाठी ५ लाखापर्यंतचे विमा संरक्षण आरोग्य अंतर्गत देण्यात येत आहे. गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्वपूर्ण मानली गेली. त्यादृष्टीने कामेही सुरु झाली. मात्र तांत्रिक अडचणीत अनेकांची नावेच तत्सम यादीमध्ये नसल्याने आयुष्यमान योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उल्लेखनीय म्हणजेचा लाभ घेण्यासाठी १५ जून २०१९ ही शेवटची तारीख आहे.
२०११ ची यादी ठरली ग्राह्य
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी २०११ ची यादी ग्राह्य ठरविण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणात भविष्यकालीन योजनांमध्ये कोणत्या कुटुंबीयांचा समावेश असू शकतो, अशी नोंदही घेण्यात आली होती. यात गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयातील अनेकांचा समावेश त्या सर्वेक्षणातील तत्सम रकान्यात करण्यात आला. तर काहींचा समावेश नाही. याचाच फटका आज जिल्ह्यातील बहुतांश गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना बसत आहे. यादीमध्ये नाव नसल्याने आशावर्कर ही घरापर्यंत पोहचल्या नाहीत.