शेकडो दिव्यांग धडकले जिल्हा परिषदेवर
By admin | Published: July 14, 2017 12:53 AM2017-07-14T00:53:01+5:302017-07-14T00:53:01+5:30
ग्रामपंचायतने दिव्यांग बांधवांवर तीन टक्के निधी खर्च करण्याचे शासन अध्यादेश आहे. मात्र, जिल्ह्यातील
तीन टक्के निधीचे प्रकरण : जिल्हाधिकारी दिवसे, खासदार पटोले यांनी दिले आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामपंचायतने दिव्यांग बांधवांवर तीन टक्के निधी खर्च करण्याचे शासन अध्यादेश आहे. मात्र, जिल्ह्यातील दिव्यांगाना या निधीचा लाभ दिला नसल्याने लाखोंचा निधी अखर्चित आहे. त्यामुळे या निधीचा लाभ त्यांना मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग आज जिल्हा परिषदेवर धडकले. दरम्यान जिल्हाधिकारी व खासदार यांनी दिव्यांगांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
७ एप्रिलला प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांचा जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आलेल्या आमदार बच्चू कडूंच्या ‘फैसला आॅन दी स्पॉट’ कार्यक्रमात त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना वजा इशारा दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाही अनेक ग्रामपंचायतीनी दिव्यांगाना त्यांचा लाभ दिलेला नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त शेकडो दिव्यांग बांधवांनी आज जिल्हा परिषद गाठले.
दरम्यान जिल्हा परिषद सभागृहात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली आठावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती. ही माहिती झाल्याने जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी दिवसे व खासदार नाना पटोले यांच्याजवळ त्यांची कैफियत मांडली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिव्यांगांच्या समास्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. यानंतर सदर सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी दिवसे व खासदार नाना पटोले यांनी दिव्यांगाना दिले.
जिल्हाधिकारी दिवसे व खासदार नाना पटोले यांच्या आश्वासनानंतर दिव्यांगांना दिलासा मिळाला. त्यांच्या समस्या केव्हा मार्गी लागतील याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
जिल्हाधिकारी, खासदारांचा जनता दरबार
आठावा बैठकीसाठी आलेल्या जिल्हाधिकारी सुहास दिवसे व खासदार नाना पटोले यांच्यासमोर दिव्यांगानी कैफियत मांडली. यामुळे जिल्हाधिकारी दिवसे व खा. पटोले यांनी ‘बडेजावपणा’ न दाखविता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरील दालनातच कर्मचाऱ्यांकडून टेबल खुर्च्या लावून घेतल्या व येथेच त्यांनी दिव्यांगासाठी जनता दरबार लावला. जिल्हाधिकारी व खासदारांच्या या साधा सरळ स्वभावामुळे दिव्यांगही भारावून गेले. यावेळी खासदारांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिव्यांगाच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
प्रशासनाची उडाली धावपळ
विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव आज अचानक जिल्हा परिषदेत दाखल झाले. महिला, पुरूषांची संख्या बघता जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषद प्रशासनाला याची पूर्व कल्पना नसल्याने त्यांच्या उपस्थितीने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. सर्व दिव्यांगांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापासून ते दालनापर्यंतचा रस्ता अडवून धरला. यामुळे काही कळायच्या आतच हे सर्व झाल्याचे चित्र जिल्हा परिषदेत बघायला मिळाले. यावेळी समाजकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांची सर्वाधिक पळापळ बघायला मिळाली.