तलाठी कार्यालय, सेतू केंद्रांवर शेकडो नागरिकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 05:03 PM2024-07-03T17:03:02+5:302024-07-03T17:03:46+5:30

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना : सुविधांअभावी नागरिकांत संताप

Hundreds of citizens throng Talathi office, Setu centers | तलाठी कार्यालय, सेतू केंद्रांवर शेकडो नागरिकांची झुंबड

Hundreds of citizens throng Talathi office, Setu centers

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
राज्य शासनाने नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्जाला सुरूवात झाली असून १५ जुलै अंतिम तिथी आहे. यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून धावपळ वाढली आहे. भंडारा शहरात मंगळवारी सिव्हील लाईन परिसरातील तलाठी कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तर सेतू केंद्रात तहसीलदारांच्या उत्पन्न व डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी शेकडो नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तासन् तास नागरिक रांगेत उभे होते. दरम्यान, कोणत्याही सुविधा प्रशासनाने न पुरविल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण दिसून आले.

मंगळवारला तलाठी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले तसेच सेतू केंद्रावरही नागरिकांच्या रांगा आणि तोबा गर्दीचे चित्र पाहावयास मिळाले. कार्यालयात जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.


सकाळी ८ वाजतापासूनच काही नागरिक दोन्ही कार्यालयांसमोर दिसून आले. अनेकांनी अन्न व पाण्यापासून ताटकळत माहिती दिली. अर्ज करण्याचा कालावधी कमी असल्याने गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले. गर्दीचे चित्र दूरवरून दिसून येताच अनेकांनी काढता पाय घेतला. सायंकाळपर्यंत पुरुषांचीहीची अशी तोबा गर्दी दिसून आली. नागरिक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. गैरसोयीचा सामनाही नागरिकांना करावा लागत असल्याचे दिसून आले.


१०० रुपयांच्या स्टॅम्पसंबंधी सूचना नाहीत
अनेक महिलांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरच्या नावात बदल असतात. त्यामुळे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र, अशा प्रतिज्ञापत्रासाठी कोणत्याही सूचना नाहीत, अशी माहिती नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांनी दिली.


रात्री ११ पर्यंत सुरू होते तलाठी कार्यालय
योजनेच्या पहिल्याच दिवशी सोमवारला भंडारा सिव्हील लाईन परिसरातील तलाठी कार्यालयासमोर महिला व पुरुषांची गर्दी होती. महिला चिमुकल्यांसह उपस्थित होत्या. महिलांच्या सोबतीला काहींची मुले तर काहींचे पती सुद्धा उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नागरिकांनी सोबत आणलेली वाहने रस्त्यावरच उभी केल्याने त्या भागातील वाहतूक प्रभावित झाली होती. रात्री ११ वाजतापर्यंत तलाठी कार्यालय सुरू होते, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.


बहिणी म्हणतात...
तलाठी मुख्यालयी रहावे

ही योजना आम्ही महिलांसाठी चांगली आहे. मात्र योजनेतील अटी व शर्तीमुळे धावपळ होत आहे. ग्रामीण भागातील तलाठ्यांना मुख्यालयी राहणे सक्त्तीचे केले जावे. तरच आमची रोजी बुडणार नाही.
- ललिता देशमुख, भंडारा.


योजना बंद पडू नये
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हा महिलांना मासिक १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळेल. हा मोठा आधारच होणार आहे. मात्र ही योजना मध्येच बंद पाडली जाऊ नये. तलाठी कार्यालय व सेतू केंद्रांवर पाणी उपलब्ध करावे. 
- स्वाती सेलोकर, भंडारा


योजनेच्या अर्जासाठी मुदत वाढ दिली जावी
सध्या या योजनेसाठी १५ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. परंतु लाभासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे मुदत वाढवावी.
आरटीओ कार्यालयाशेजारील सेतू केंद्रात नागरिकांची अशी झुंबड उडाली.
- लता बोरकर, भंडारा 


 

Web Title: Hundreds of citizens throng Talathi office, Setu centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.