भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे विद्यार्थ्यांनी केला रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:01 PM2018-08-06T14:01:23+5:302018-08-06T14:04:14+5:30
एसटी बस फेरी सुरू करण्याच्या मागणीसाठी लाखांदूर येथे सोमवारी सकाळी १० वाजतापासून विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यांनी पवनी - लाखांदूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: एसटी बस फेरी सुरू करण्याच्या मागणीसाठी लाखांदूर येथे सोमवारी सकाळी १० वाजतापासून विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यांनी पवनी - लाखांदूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली.
लाखांदूर येथे मोहर्णा, डांभेविरली, गवराळा, टेंभरी, खैरीपट, सावरगाव नांदेड, मांढळ येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या मार्गावर नियमित दोन बस सुरू होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यावर काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले. एसटी महामंडळाने एक महिन्यापासून बस सेवा बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांना पाच ते सात किलोमीटर शाळेत चालत यावे लागते. सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पवनी ते लाखांदूर रस्त्यावर सकाळी १० वाजता रस्ता रोको सुरू केला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. नायब तहसीलदार विजय कावळे, पोलिस उपनिरिक्षक के.के. गेडाम यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. वृत्तलिहेस्तोवर चक्का जाम सुरूच होता.