कत्तलीस जाणाऱ्या दीड हजार जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:28 PM2018-12-30T22:28:59+5:302018-12-30T22:29:17+5:30
कतलीसाठी जाणाऱ्या दीड हजारावर जणावरांची विविध ठिकाणी सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. १२९ जणांवर गुन्हे दाखल करुन सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कतलीसाठी जाणाऱ्या दीड हजारावर जणावरांची विविध ठिकाणी सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. १२९ जणांवर गुन्हे दाखल करुन सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह विविध मार्गावरुन जनावरांची निर्दयपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. कतलीसाठी ही जनावरे नेली जातात. याविरुध्द पोलिसांनी मोहीम उघडून वर्षभरात एक हजार ४४७ जनावरांची मुक्तता केली. या सर्व जनावरांची रवानगी गोरक्षणमध्ये करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये ७७ प्रकरणे दाखल करण्यात आली असून यात ७४ वाहने जप्त करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात ४४ जनावरांची सुटका करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात ५१ जनावरे, एप्रिल महिन्यात ७३, मे महिन्यात १०५ जूनमध्ये ५४, जुलै २५८, आॅगस्ट ४७१, सप्टेंबर २२, आॅक्टोबर १९, नोव्हेंबर १९, डिसेंबर ०४ अशी जनावरांची सुटका झाली. या प्रकरणात १२९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तर गोमांस विक्री प्रकरणात जिल्ह्यात १७ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३०२ किलो मांस जप्त करण्यात आले. तर २० जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.