राष्ट्रीय महामार्गावरील शेकडो झाडांची झाली कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:24 AM2021-07-11T04:24:11+5:302021-07-11T04:24:11+5:30
झाडाअभावी हरविले रस्त्यांचे साैंदर्य : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची गरज तुमसर : रामटेक-खापा-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण काढून सिमेंटचा पक्का रस्ता ...
झाडाअभावी हरविले रस्त्यांचे साैंदर्य : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची गरज
तुमसर : रामटेक-खापा-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण काढून सिमेंटचा पक्का रस्ता तयार करण्यात आला. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली जुनी डेरेदार कडुनिंब, सागवान, पळस, आंबा, गुलमोहोर, करंजी, मोह, खैर, चिचवा, वड आदी महत्त्वपूर्ण प्रजातीची झाडे तसेच रस्त्याच्या बाजूला असलेले सीताफळाचे बन रस्ता तयार करण्याच्या गरजेपोटी कापली गेली.
या झाडांचा उपयोग गेली अनेक वर्षे सातत्याने प्रवाशांना झाला. पण, रस्ता जरी सिमेंटचा आणि मोठा झालेला असला तरी झाडांपासून मिळणाऱ्या सावलीला मुकावे लागत असून, झाडांविना सिमेंट रस्ता बोडका दिसत आहे. अनेकजण प्रवासी निवारे नसताना किंवा बऱ्याच ठिकाणी असूनसुद्धा झाडाच्या सावलीतच बस, ऑटो जीपची वाट बघत बसतात. अचानक आलेल्या पावसापासून, कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाचाच सर्वात जास्त आधार असतो. झाडांमुळे रस्त्यावर चालताना जास्त गरम हवा लागत नाही. अनेक गाड्या काही क्षणांच्या विश्रांतीसाठी झाडाखाली थांबतात. दूरवर प्रवास करणारे ट्रकचे चालक, क्लिनर झाडाखाली थांबून स्वयंपाक तसेच आराम करतात. बैलबंडी, ट्रॅक्टर, ऑटो, बाईक, जीप या सर्वांसाठी ही झाडे वर्षभर विशेषत: उन्हाळ्यात उन्हापासून बचावासाठी आधार होती. पण, आता मात्र या रस्त्याने जाताना दूरदूरपर्यंत झाडे दिसत नसल्याने तीव्र उन्हाच्या झळा सहन करीत प्रवाशांना प्रवास करण्यावाचून पर्यायच राहिला नसल्याचे चित्र आहे.
पर्यावरण आणि प्रवाशांच्या हितासाठी सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक बांधकाम व वनविभागाच्यावतीने वृक्षारोपण करून झाडे मोठी होईस्तोवर संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने दीर्घ स्वरूपाच्या उपाययोजना व त्याची अंमलबजावणी करून रस्ता हिरवागार करणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रवाशांना वर्षभर झाडांचा गरजेच्याप्रसंगी आधार घेता येईल, अशी मागणी शिवसेनेने राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा येथे उपविभागीय अभियंता संजीव जगताप यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पर्यावरणप्रेमी तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखाप्रमुख निखील कटारे उपस्थित होते.