एलोरा पेपर मिलच्या दोनशे कामगारांवर उपासमारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:41 AM2021-08-17T04:41:03+5:302021-08-17T04:41:03+5:30
तुमसर: एलोरा पेपर मिल कारखान्यातील सुमारे २०० स्थायी व अस्थायी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर येण्यास कारखाना प्रबंधकाने ...
तुमसर: एलोरा पेपर मिल कारखान्यातील सुमारे २०० स्थायी व अस्थायी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर येण्यास कारखाना प्रबंधकाने मनाई केली. दुसरीकडे कारखान्यात बाहेरील कंत्राटी कामगारांना बोलावून कामे सुरू आहेत. येथे शासनाची परवानगी न घेता कारखान्यातून साहित्य बाहेर नेणे सुरू असून कारखान्यातील यंत्र काढून नेणे सुरू आहे. याची चौकशी करून कामगारांना न्याय मिळावा याकरिता कामगारांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले.
एलोरा पेपर मिल हा मागील ४५ वर्षांपासून कारखाना सुरू असून आंतरराष्ट्रीय दर्जाचा कागद येथे तयार होते. या कारखान्यात सुमारे २०० कामगार स्थायी व अस्थायी कार्यरत आहेत परंतु येथील कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावर येण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांच्या उपासमारीचे संकट ओढावले आहे. कारखान्यात नियमित कायमस्वरूपी काम करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून बंद करणे काम कारखाना बंद पडण्याची पूर्वसूचना शासनाने देणे कारखाना बंद पडण्याची पूर्वपरवानगी न घेणे व कारखाना औद्योगिक अधिनियम १९४७ च्या कलम २२(२) नियमांचेही उल्लंघन ठरणारे आहे, असा आरोप राष्ट्रीय मजदूर मंचने लावला आहे. कारखाना व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे परंतु कारखाना व्यवस्थापकांनी औद्योगिक नियमांचे पालन केले नाही. हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ९ ऑगस्टपासून राष्ट्रीय मजदूर मंचच्या नेतृत्वात कामगारांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले. कामगारांनी सर्व कामगारांचे थकीत वेतन व चालू वेतन देणे, ११ कामगारांचे दिनांक १८ जुलै २०२१ चे टरमिशन पत्र परत घेणे, कारखाना पूर्व सुरू करणे, कारखान्यातील मशीन तोडफोड न करता कायमस्वरूपी कामगारांना कामावर घेणे आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.
कंपनी व्यवस्थापन येथे शासनाची परवानगी न घेता कारखान्यातून साहित्य बाहेर काढून स्थायी व अस्थायी कामगारांना डावलून बाहेरील कंत्राटी कामगारांना बोलावून कामे करत आहे. कारखान्यातील यंत्र काढून त्यांची तोडफोड करणे याठिकाणी सुरू आहे. कंपनी व्यवस्थापनाने २२ जुलै २०२१ ला कामगारांना येथे तोंडी सूचना देऊन स्थायी व अस्थायी कामगारांना दिनांक २३ जुलैपासून कारखाना बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे कामगारांनी कामावर येऊ नये, असे सांगण्यात आले. कामगार प्रतिनिधी व नोंदणीकृत कामगार संघटनेला कोणतीही नोटीस न देता व शासनाची पूर्वपरवानगी न घेता कारखान्याचे कामकाज बंद करण्यात आले आहे. हे औद्योगिक नियमाच्या विरोधात आहे. कामगारांचे वर्ष २०१८, २०१९,२०२० व २०२१ या वर्षाचे वेतन थकीत आहे येथील कारखाना प्रबंधक जबरदस्तीने कामगारांचे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. असा आरोप राष्ट्रीय मजदूर मंचाने लावला आहे.संघटनेचे प्रतिनिधी व व्यवस्थापक यांच्यात झालेल्या चर्चेत कामगारांची कोणतीही बाजू ऐकून घेण्याच्या तयारीत नाही. कामगारांत असंतोष आहे. धरणे आंदोलनस्थळी माजी आ. चरण वाघमारे यांनी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली.
बॉक्स
कारखान्याकडे ११४ एकर जमीन
एलोरा पेपर मिल मोहाडी तालुक्यातील देवापुर येथे असून १९७६ पासून हा कारखाना मागील ४५ वर्षांपासून सुरू आहे. शासनाकडून या कारखान्याला सुमारे शंभर एकर जमीन भाडेतत्त्वावर देण्यात आल्याची माहिती आहे. हा कारखाना नियमांनुसार विक्री करता येत नाही. कारखाना विक्री करण्याकरता शासनाची नक्कीच पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. सुमारे २०० कामगार येथे स्थायी व अस्थायी असून त्यांचे वेतन व इतर देणी आवश्यक आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.