पती-पत्नीने घातला बँकेला ७३ लाखांचा गंडा; पाचजणांच्या कागदपत्रांवर उचलले कर्ज अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 05:07 PM2022-05-09T17:07:32+5:302022-05-09T18:36:17+5:30
पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
लाखांदूर (भंडारा) : हार्वेस्टर खरेदीसाठी पाचजणांच्या कागदपत्रांवर नागपूरच्या कोटक महिंद्रा बँकेला ७३ लाख रुपयांचा गंडा लाखांदूर येथील ट्रॅक्टर व कृषी अवजारे विक्रेत्या पती-पत्नीने घातल्याचा प्रकार उघडकीस आला. पाचहीजण छत्तीसगड राज्यातील आहेत. याप्रकरणी बँक शाखा व्यवस्थापकाने लाखांदूर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पती-पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतना सचिन चंदनबावणे व सचिन चंदनबावणे अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. लाखांदूर येथील वृषभ ट्रॅक्टर अँड कृषी अवजारे दुकानाचे ते दोघेही संचालक आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये चंदनबावणे पती-पत्नीने छत्तीसगड राज्यातील केशवकुमार रतनलाल कश्यप (वय ५०), रूपकुमार पटेल (२८), बुद्धनाथ शाहू (३८), शिवराम कश्यप (३२) व गोपालकृष्ण कश्यप (४०) आदी पाच ग्राहकांची कागदपत्रे मिळविली. त्या आधारावर नागपूरच्या कोटक महिंद्रा बँकेतून विशाल कंपनीचे हार्वेस्टर मशीन खरेदीसाठी तब्बल ७३ लाखांच्या कर्जाची उचल केली होती. मात्र कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर ग्राहकांना हार्वेस्टर दिलेच नाही.
काही दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेने ग्राहकांकडे जाऊन चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडे हार्वेस्टर नव्हते. त्यांच्या कागदपत्रांवरून कर्ज उचलल्याचे पुढे आले. अखेर नागपूरच्या कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापक दीपक खनके यांनी शनिवारी याप्रकरणी लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास लाखांदूर ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक युवराज ऊईके करीत आहेत.