पतीने घेतली माघार, पत्नी निवडणुकीच्या मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 11:46 AM2021-12-17T11:46:58+5:302021-12-17T11:55:17+5:30
एका गटात पती -पत्नी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, पक्षाने तिकीट नाकारली. म्हणून आपली शक्ती दाखविण्यासाठी पत्नीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे.
राजू बांते
भंडारा : पती -पत्नी यांनी एकाच क्षेत्रातून नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यांना एका राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे पतीने निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, पतीने पत्नीला निवडणुकीच्या संग्रामात उतरविले आहे.
मोहाडी तालुक्यात आंधळगाव, करडी, बेटाळा व पाचगाव या गटांत चार जागेसाठी २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २३ पैकी केवळ १ महिला पाचगाव या गटातून चार पुुरुष उमेदवारांविरुद्ध निवडणुकीत सामना करणार आहे. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शेवटच्या क्षणी तिकिटांची कापाकापी केली. त्यामुळे गण व गटात बंडखोरी झाली आहे. एका गटात पती -पत्नी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, पक्षाने तिकीट नाकारली. म्हणून आपली शक्ती दाखविण्यासाठी पत्नीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ही लढाई त्यांच्या अस्तित्वाची राहणार आहे. आंधळगाव गटात एकाच गावाचे चार उमेदवार, तर क्षेत्राबाहेरचे मलिदा येथील उमेदवार उभे आहेत.
पंचायत समितीच्या १४ गणापैकी ११ गणात निवडणूक होत आहे. ११ जागेसाठी ५० उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत. यात २९ पुरुष उमेदवार व २१ महिला उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. ५ महिला उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. बेटाळा निर्वाचन गणातून सर्वात जास्त ७ उमेदवार उभे आहेत. तर सर्वांत कमी ३ उमेदवार डोंगरगाव निर्वाचन गणातून निवडणुकीच्या रणांगणात आहेत. ११ गणात कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढती बघायला मिळणार आहे.
उमेदवारांना १३ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह प्राप्त झाले. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत निवडणूक पुढे ढकलली जाईल याची धास्ती सर्वच उमेदवारांनी घेतली होती. प्रचार साहित्य कुणी छापले नव्हते. केवळ मोजके उमेदवार केवळ मतदारांच्या भेटी-गाठी घेत होत.
बंडाचा लाभ कुणाला?
पाचगाव गटात पाच उमेदवार उभे आहेत. यात एकाच समाजाचे चार उमेदवार रिंगणात आहेत. बेटाळा क्षेत्रात सहा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या क्षेत्रात सगळेच उमेदवार दमदार आहेत. इथे एकास - एक अशी बलाढ्य निवडणूक बघायला मिळणार आहे. करडी क्षेत्राला भाजपमध्ये बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. या क्षेत्रात सात उमेदवार उभे आहेत. बंडाचा लाभ कॉंग्रेस की राष्ट्रवादी पक्षाला मिळेल हे निवडणूक झाल्यावर कळणार आहे.