पती गेले, आता कर्ज कसे फेडायचे!
By Admin | Published: August 5, 2016 12:40 AM2016-08-05T00:40:20+5:302016-08-05T00:40:20+5:30
तालुक्यातील सातलवाडा येथील हौसीलाल बिसेन (५३) या शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापीकीला कंटाळून राहत्या घरीच ...
कुटुंबीयांसमोर पेच : प्रकरण सातलवाडा येथील शेतकरी आत्महत्येचे
संजय साठवणे साकोली
तालुक्यातील सातलवाडा येथील हौसीलाल बिसेन (५३) या शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापीकीला कंटाळून राहत्या घरीच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या शेतकऱ्यावर सोसायटी व इतर बँकाचे मिळून दोन लाखापेक्षा अधिक कर्ज आहे. पतीने आत्महत्या केली. आता कर्जाची परतफेड करायची तरी कशी असा प्रश्न मृतकाची पत्नी शारदाबाई व मुलांसमोर आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोपचे कुटुंबियाची भेट देवून त्यांचे सांत्वन केले.
बिसेन कुटुंबियाकडे पाच एकर जमीन आहे. या शेतीच्या भरोश्यावर पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांचा उदरनिर्वाह करायचा. चारपाच वर्षापुर्वी हौसीलालने दोन्ही मुलांचा व मुलीचा विवाह केला. मात्र शेतीला सिंचनाची सोय नसल्यामुळे दोन वर्षापुर्वी महाराष्ट्र बँकेतून कर्ज काढून बोरवेल खोदली. सततची नापीकी व वाढते कर्जाचे डोंगर याला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी हौसीलालने आत्महत्या करीत असल्याबाबत चिठ्ठी लिहून ठेवली होती. घटनेचा दुसरा दिवस असून महसुल प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने मृत शेतकऱ्याच्या कुटूंबियांची भेट घेतली नाही.
मदत द्या -राकाँची मागणी
मृतक हौसीलाल बिसेन यांची परिस्थिती हलाखीची होती. शेतीसाठी त्यांनी दोन लक्ष रूपये कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करू न शकल्याने आत्महत्या केली. त्यामुळे हौशीलालचे कर्ज माफ करून पाच लाखांची मदत करावी, अशी मागणी राकाँचे प्रदेशसचिव अविनाश ब्राम्हणकर, माजी सभापती मदन रामटेके यांनी केली आहे.
यावेळी नरेंद्र वाडीभस्मे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश कापगते, हेमंत भारद्वाज, सरपंच रामकृष्ण कोही, ग्रामसेवक विनोद भेंडारकर, सेवा सहकारीचे अध्यक्ष शैलेश गजभिये यासह अन्य उपस्थित होते.
भजन करून केली आत्महत्या
हौसीलाल हा मनमिळावू वृत्तीचा होता. गावात कोणतेही कार्यक्रम असो त्यात हौसीलालची हजेरी असायचीच. हौसीलाल हा भजन म्हणायचा. घटनेच्या आदल्या दिवशी श्रावण महिन्याची सुरवात व जिवतीचा सण होता. त्यामुळे गावातील हनुमान मंदिरात रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यात हौसीलालनेही भजन म्हटले. कर्जाची चिंता होतीच त्यामुळे घरी जाऊन त्याने किटकनासक प्राशन करून जीवनज्योत संपविली.
परिस्थिती हलाखीची
बोपचे कुटुुंबियांची परिस्थिती हलाखीची आहे. शेतीवर उदरनिर्वाह होत नसल्यामुळे शेतीचा हंगाम झाला की हौसीलालची दोन्ही मुले ही शहरात कामासाठी जात होती. त्यामुळे घटनेच्यावेळी हौसीलालचा लहान मुलगा प्रमोद हा हजर होता तर मोठा मुलगा पवन हा दोन महिन्यापुर्वी कर्नाटक येथे मजुरीसाठी गेला.वडिलांच्या मृत्युची बातमी मिळाली असली तरी प्रवास लांबचा असल्यामुळे तो उद्या ५ ला सायंकाळपर्यंत पोहचणार आहे.
तालुक्यातील गावात एका शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केली. घटनेची माहिती सर्वांनाच मिळाली मात्र साकोलीच्या तहसलिदारांनाही बोपचे कुटुुंबियांना साधी भेट घेण्याचीही वेळ मिळाली नाही.