पत्नीचा खून करून विष प्राशन करणाऱ्या पतीचाही मृत्यू; दोन वर्षाची चिमुकली पोरकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 06:34 PM2022-03-23T18:34:28+5:302022-03-23T18:38:46+5:30
चरणदासची पपिता ही तिसरी पत्नी होती. ती चांगली वागत नाही म्हणून तिचा तिरस्कार चरणदास करीत होता.
भंडारा : पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर विष प्राशन करणाऱ्या पतीचाही मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी पत्नीचा गळा आवळल्यानंतर पसार होऊन पतीने विष प्राशन केल्यानंतर त्याच्यावर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. पती-पत्नीच्या वादात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चरणदास सुखराम राऊत (४०, रा. पळसपाणी) असे मृताचे नाव आहे.
विशेष म्हणजे मंगळवारी त्याच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा साकोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चरणदासची पपिता (३२) ही तिसरी पत्नी होती. ती चांगली वागत नाही म्हणून तिचा तिरस्कार चरणदास करीत होता. दरम्यान रविवारी स्वयंपाक खोलीत पपिताचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर चरणदास आपल्या बहिणीच्या गावी पळून गेला. मात्र, तेथे त्याने विष प्राशन केल्याचे लक्षात आले.
त्याला तत्काळ साकोली व नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री चरणरासचाही मृत्यू झाला. नागपूर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी त्याचा मृतदेह पळसपाणी येथे आणण्यात आला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहे.
दोन वर्षाची चिमुकली झाली निराधार
पपिता ही चरणदासची तिसरी पत्नी असून, तिच्यापासून दोन वर्षाची मुलगी आहे. पपिताचा चरणदासने खून केला आणि स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दोन वर्षाची चिमुकली निराधार झाली आहे. सध्या ही चिमुकली आपल्या काकाकडे आहे.