शेती पाहिजे पण नवरा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:46+5:302021-03-05T04:34:46+5:30
पूर्वी शेतीला प्रथम स्थान आणि नोकरीला किंवा व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जायचे. त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होताना फारशी अडचण ...
पूर्वी शेतीला प्रथम स्थान आणि नोकरीला किंवा व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जायचे. त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होताना फारशी अडचण येत नव्हती. त्या वेळेला मुलगी म्हणजे कुटुंबावरचे ओझे ही मानसिकता तळागाळात रुजलेली होती. त्यामुळे लग्न करताना फारसा विचार मुलींच्या बाजूने केला जात नव्हता. त्यावेळी मुलांचा एक वेगळाच रुबाब होता. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी लग्नाची परिभाषा बदलत गेली. मुली शिकू लागल्या, उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या. कुटुंबासाठी भार असणाऱ्या मुली कुटुंबाचा आधार होऊ लागल्या. बदललेल्या परिस्थितीमुळे आणि मानसिकतेमुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या
नोकरी, शेती आणि चांगले घर असेल तर त्या मुलाच्या लग्नात अडचणी कमी येतात. पण ग्रामीण भागात आज अनेक युवक शेती करत आहेत. वडिलोपार्जित शेती करून चांगले उत्पन्न मिळवत असताना देखील शेतकरी मुलाला नकार घंटाच ऐकायला मिळत आहे. मुली शिकून नोकरी करत असल्यामुळे आपला जोडीदार आहे नोकरी करणारा असावा अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. नोकरीवाला नवरा पाहिजे त्यातही त्याला सरकारी नोकरी पाहिजे या भूमिकेमुळे शेतकरी मुलांचे मात्र फार अवघड होत आहे. अनेक शेतकरी युवक लग्नासाठी हेलपाटे मारत आहेत.
बॉक्स
पूर्वी लग्न करताना मुलांच्या घरच्या मंडळींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असायच्या. किंबहुना त्यांचा निर्णय अखेरचा असायचा त्यामुळे लग्नामध्ये वर पक्षाची चलती पाहायला मिळायची. पण जसजसा काळ बदलत गेला तशी लग्नाची सूत्रे बदलत गेली. आज लग्न करायचे की नाही हे वधूपक्ष म्हणजे मुलींच्या बाजूवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लग्नाच्या सर्व चाव्या मुलींकडे गेलेल्या आहेत.