चिन्ह बदलेल्या उमेदवाराचे उपोषण सुरु
By admin | Published: July 3, 2015 01:00 AM2015-07-03T01:00:30+5:302015-07-03T01:00:30+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रदान करण्यात आलेल्या निवडणूक चिन्हावर दोन दिवस प्रचार केल्यानंतर अचानक चिन्ह बदलण्यात आला.
साकोली : जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रदान करण्यात आलेल्या निवडणूक चिन्हावर दोन दिवस प्रचार केल्यानंतर अचानक चिन्ह बदलण्यात आला. त्यामुळे उमेदवार संभ्रमात पडला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या नियमबाह्य कृतिविरोधात त्यांच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.
साकोली तालुक्यातील किन्ही (एकोडी) या जिल्हा परिषद गटातून कैलास गेडाम अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहे. २९ जून रोजी नामनिर्देेशनपत्र मागे घेण्याच्या दिवशी सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात कैलास गेडाम यांना 'विमान' चिन्ह मिळाले. या चिन्हाचे पत्रक व बॅनर तयार करून गेडाम यांनी दोन दिवस प्रचार केला. तथापि तिसऱ्या दिवशी गेडाम यांना विमान ऐवजी टेबल चिन्ह दिल्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने भ्रमणध्वनीद्वारे दिली. हे ऐकून गेडाम बुजकड्यात पडले. प्रचाराला केवळ दोन दिवसाचा अवधी असल्याने नवीन चिन्हावर प्रचार करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चिन्हात बदल करताना निवडणूक नियमानुसार गेडाम यांना विमान चिन्ह दिल्याचे वा त्यांना टेबल चिन्ह दिल्याचे तसेच गेडाम यांनी नवीन चिन्ह नाकारल्याचे कोणतेही पत्र या उमेदवाराच्या घरावर चिकटविण्यात आले नाही. उमेदवाराने नवीन चिन्हाचा विरोध करताच त्यांच्या गैरहजेरीत पत्रक चिकटवून वडिल आणि पत्नीची बळजबरीने स्वाक्षरी घेण्यात आल्याचा तसेच नवीन चिन्ह स्विकार करण्याबाबत दबात आणला जात असल्याचा आरोप गेडाम यांनी केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पुर्वी दिलेले विमान चिन्ह कायम ठेवावे, अशी मागणी करीत गेडाम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जुने चिन्ह कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी आज गुरूवारपासून साकोली येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर कैलास गेडाम यांनी उपोषणाला प्रारंभ केला.