हेक्टरी २३ क्विंटल उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर बटाटा लागवडीचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:52+5:302021-04-19T04:32:52+5:30
तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा येथील प्रकाश दुर्गे यांनी बटाटा पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शेतात एक एकर ...
तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा येथील प्रकाश दुर्गे यांनी बटाटा पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शेतात एक एकर बटाटा लागवड केली. मात्र, त्यानंतर बियाणाचा तुटवडा असल्यामुळे बाकी शेती पडीक ठेवली होती. अशातच भंडारा उपविभागीय कृषी, अधिकारी शांतीलाल गायधने, तुमसरचे तालुका कृषी अधिकारी विकास काळे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायकांच्या भेटीदरम्यान प्रकाश दुर्गे यांना शेतजमीन पडीक ठेवण्यापेक्षा या हिरवळीच्या खतासाठी सोनबोरू लागवड करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार कृषी विभागातर्फे त्यांना हिरवळीच्या खतासाठी सोनबोरू लागवडीसाठी ५० किलो बियाणे पुरवीत त्यांना वेळोवेळी भेटून मार्गदर्शन केले. यामुळे अवघ्या काही सोनबोरू जमिनीत गाडून काही महिन्यांतच पुन्हा बटाटा पिकाची लागवड केल्याने त्यांना त्याच अडीच एकरात २३ क्विंटल बटाट्याचे उत्पन्न मिळाले. यामध्ये दुर्गे यांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे त्यांना एक लाख ३८ हजारांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये त्यांना जमीन तयार करण्यासाठी चार हजार रुपये, पाणी देणे, कापणी, मळणी यासाठी एकूण नऊ हजार रुपये, असा एकूण १३ हजार रुपये खर्च वजा करता त्यांना अडीच एकरात १ लाख २५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.
बॉक्स
शेतकऱ्यांनी धान पिकाची पीक पद्धत बदलावी
भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र, आता काळानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केल्यास कोणतेही पीक चांगले येऊ शकते, याचा आदर्शच प्रकाश दुर्गे यांनी एकरी ५० हजारांचा निव्वळ नफा मिळवून अडीच एकरात १ लाख २५ हजारांचे उत्पन्न निव्वळ नफा मिळवीत हे खरे करून दाखविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोरोना संसर्गाचे सावट असले तरीही पीक पद्धत बदलून ग्राहकांची असलेली गरज ओळखत अशा विविध पिकांची लागवड करण्याची गरज असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
कोट
मी बटाटा लागवडीचा निर्णय घेतला होता. मात्र, बियाणे उपलब्ध न झाल्याने जमीन पडीक ठेवली होती. मात्र, मला कृषी विभागाच्या मार्गदर्शनात सोनबोरू या हिरवळीच्या खत लागवडीसाठी प्रोत्साहित केले. त्यामुळेच आज मला हेक्टरी एक लाख पंचवीस हजारांचा बटाटा लागवडीतून निव्वळ नफा मिळाला. शेतजमीनही भुसभुशीत झाली आहे.
प्रकाश दुर्गे, शेतकरी, गर्रा बघेडा.
कोट
जिल्ह्यात सोनबोरूसह अन्य हिरवळीच्या खतांवर पीक चांगले येते. याचा शेतकऱ्यांना खर्चही कमी येतो आणि उत्पन्नही जास्त होते. यासोबतच शेतजमिनीचा पोत सुधारण्यासही चांगली मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा अतिरेक न करता हिरवळीची खते वापरून शेतजमिनीचा पोत सुधारण्याची आज गरज निर्माण झाली आहे. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.
शांतीलाल गायधने, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.