शहरातील रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:49 AM2019-07-08T00:49:45+5:302019-07-08T00:50:33+5:30
गेल्या १० ते १२ वर्षांपासून भंडारा नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गेल्या १० ते १२ वर्षांपासून भंडारा नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शहरातील चाचा नेहरू उद्यान, राणी लक्ष्मीबाई वार्ड, सहकार नगर, समता नगर, पाण्याच्या टाकीजवळचा भाग, कारागृहाच्या मागील भाग, केशव नगर, खातरोड, तुळजा भवानी मंदिर परिसर, भगतसिंग वार्ड, बसस्थानक परिसर शांती नगर, गरुनानक वार्ड अशा अनेक भागांमध्ये तसेच अतिक्रमीत आदी सर्व प्रकारचे मिळून शेकडो रिकामे भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून तसेच कायम आहेत. सदर भूखंड हे खोलगट भागात असल्याने पावसाळ्यात या भूखंडात दरवर्षी पाणी साचते. यावषीर्ही अशीच परिस्थिती आहे. भंडारा शहरात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्याने रिकाम्या भूखंडात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्याचा लगतच्या घरांना व कुटुंबांना त्रास होत आहे.
पावसाळा वगळता इतर ऋतुमध्ये मोकळ्या भूखंडावर लगतचे नागरिक घरातील कचरा बिनधास्तपणे टाकतात. आता पावसाचे पाणी रिकाम्या भूखंडावर साचले असल्याने कचरा तरंगत असल्याचे दिसून येत आहे. रिकाम्या भूखंडाची जागा खोलगट असल्याने येथून दुसरीकडे पाण्याची निचरा होत नाही. बहुतांश भूखंड मालक भंडारा शहरात राहत नसल्याने नगर पालिकेला सदर प्लॉटमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची नालीही खोदता येत नाही. त्यामुळे रिकाम्या भूखंडापासून सांडपाण्याची तयार झालेल्या या समस्येला मार्गी लावण्यासाठी पालिकेसमोरही पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी पाणी साचून डबक्या स्वरूप प्राप्त झाल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पावसाळ्यात विविध आजाराची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
कर आकारणी करा
शहरातील बऱ्याच प्रभागात शेकडोच्या संख्येने रिकामे-मोकळे भूखंड आहेत. सदर भूखंडाची देखभाल करण्याकडे संबंधित मालकांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सदर रिकाम्या भूखंडात आता पावसाचे पाणी साचले आहे. भूखंडात साचलेल्या पाण्याचा त्रास सभोवतालच्या घरांना होत आहे. रिकामे भूखंड नेमक्या कुणाच्या मालकीचे आहे हे लगतच्या माहित नाही. रिकाम्या भूखंडाची ही समस्या मार्गी लावून सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा होण्यासाठी कार्यवाही व्हावी, त्यासाठी पालिके शहरातील रिकाम्या भूखंड मालकांवर कराची आकारणी करणे महत्वाचे आहे.