कृषी दुकानांवर नजर; बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल!

By युवराज गोमास | Published: May 2, 2024 04:56 PM2024-05-02T16:56:26+5:302024-05-02T16:58:59+5:30

Bhandara : जिल्हाभरात आठ भरारी पथके गठीत; राज्य शासनाच्या कारवाईच्या सूचना

If agricultural stores sell bogus fertilizers and seeds, then it might lead to jail! | कृषी दुकानांवर नजर; बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल!

Selling of bogus fertilizers and seeds is illegal

भंडारा : खरीप हंगाम तोंडावर येवून ठेवला आहे. आगामी काळात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्यास संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी तालुकास्तरावर सात व जिल्हास्तरावर एक असे आठ भरारी पथके नियुक्त करून लक्ष ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे खरिपासाठी जमिनीची नागरटी करून शेत तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. याशिवाय उन्हाळी धान कापणीला तसेच मळणीला लवकरच प्रारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. परंतु, अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतीची कामे सध्या रेंगाळत चालली आहेत. उन्हाळी कामे संपताच खरीपाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.


...तर परवानाही होणार निलंबित

खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.


प्रत्येक तालुक्यात एक पथक

जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर आदी ७ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रताणे सात भरारी पथकांचे गठण कृषी विभागाचे आदेशान्वये करण्यात आले आहे. यासोबतच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, वेळीच तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे.

जिल्हास्तरावर एक स्वतंत्र पथक

तालुकास्तरावर सात भरारी पथकांसह जिल्हास्तरावरही स्वतंत्र एक भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

शासनाचे सूचनेनुसार जिल्हास्तरावर एक गुणनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ७०५८२१७९७७ या क्रमांकाचा मोबाईल नंबरवर बियाणे, खते, किटकनाशके आदींच्या गुणवत्तेसाठी तक्रार करता येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांची खात्री करूनच किंवा इतर शेतकऱ्यांनी यापूर्वी लागवड केल्यानंतर मिळालेले परिणाम लक्षात घेवून बियाण्यांची खरेदी करणे अपेक्षीत आहे.


शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके मान्यतापात्र कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत. तसेच खरेदी केलेल्या पावत्या जपून ठेवाव्यात. खते असोत वा बियाणे त्यांच्या पॅकिंगबाबतची माहिती वाचून घ्यावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे ७०५८२१७९७७ या मोबाईल नंबरवर तक्रार करावी. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आठ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे.
- विराग देशमुख, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, भंडारा.

 

Web Title: If agricultural stores sell bogus fertilizers and seeds, then it might lead to jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.