डॉक्टरांना अटक केल्यास राज्यभर वैद्यकीय सेवा ठप्प पाडू; आयएमए व मॅग्मोचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:10 AM2021-01-25T06:10:04+5:302021-01-25T06:10:25+5:30
वैद्यकीय अधिकारी व नर्सेस यांच्यामागे पोलीस कारवाईचा ससेमिरा सुरू असतानाच संघटनांनी ही आग्रही भूमिका घेतली आहे.
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सात जणांवर प्रशासकीय कारवाईनंतर पोलीस कारवाई केल्यास राज्यव्यापी वैद्यकीय सेवा ठप्प पाडण्याचा निर्वाणीचा इशारा आयएमए व मॅग्मो संघटनांनी दिला आहे.
वैद्यकीय अधिकारी व नर्सेस यांच्यामागे पोलीस कारवाईचा ससेमिरा सुरू असतानाच संघटनांनी ही आग्रही भूमिका घेतली आहे. दरम्यान, रविवारी कुणावरही गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. घटनेच्या १४ दिवसांनंतर राज्य शासनाने सात जणांवर कारवाई केली, तर न्यायवैद्यक चौकशीच्या अहवालानंतर पोलिसांची भूमिका ठरेल, असे सांगितले जात आहे.
शनिवारी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाच्या पाहणीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोन तास बंदद्वार चर्चा केली. परिणामी संबंधितांवर गुन्हे दाखल होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.