फायर ऑडिट झाले असते तर निष्पाप चिमुकल्यांचा जीव वाचला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:31 AM2021-01-13T05:31:51+5:302021-01-13T05:31:51+5:30
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ४५० खाटांची व्यवस्था आहे. जवळपास साडे तीन दशकांपूर्वी उभारण्यात आलेल्या ...
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ४५० खाटांची व्यवस्था आहे. जवळपास साडे तीन दशकांपूर्वी उभारण्यात आलेल्या या भव्यदिव्य रुग्णालयाची वास्तू थोड्याफार प्रमाणात जीर्ण झाली आहे. वाढती लोकसंख्या व गरजेनुसार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात अन्य वास्तू उभारण्यात आल्या. मात्र अत्यंत निकडीची व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब समजली जाणारी फायर सेफ्टी यंत्रणा उभारण्यात आलीच नाही. यासंदर्भात २०१८ मध्ये फायर सेफ्टी यंत्रणा व अलार्मबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावर विचार करण्यात तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला. जून २०२० मध्ये फायर सेफ्टी यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासनाने राज्य शासनाकडे १ कोटी ५२ लक्ष ४४ हजार २८३ रुपयांचे अंदाजपत्रक पाठविले. रुग्णालयात फायर ऑडिट हा दर सहा महिन्यात करणे अपेक्षित असताना ते झाले नाही. किंबहुना पाठवलेल्या प्रस्तावाचाही पाठपुरावा करण्यात आला नाही.
फायर सेफ्टी करिता दीड कोटी रुपये लागतील, असे शासनास पत्र पाठवण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे प्रस्तावातील त्रुटी अजूनपर्यंत दूर झालेल्या नाहीत. ज्या विभागाकडे ही फाईल पेंडिंग होती त्यावरही आक्षेप घेण्यात आला नाही. कोरोना संकट काळात हा प्रस्ताव तसाच धूळ खात राहिला. याचा भीषण परिणाम शनिवारी दहा चिमुकल्यांचा जीव घेऊन समोर आला.
बॉक्स
फायर ऑडिट झालेच नाही
राज्य शासनाच्या सन २००६ च्या नियमाप्रमाणे ‘फायर अँड सेफ्टी’अंतर्गत संबंधित यंत्रणेने स्वतःहून फायर ऑडिट करणे महत्त्वाचे आहे. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेच नाही. विशेष म्हणजे सामान्य रुग्णालयाचे जर ते ऑडिट झाले आहे तर ते कोणाकडून करून घेतले, हे बघणेही आवश्यक आहे. लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात स्मोक सेंसर व अलार्म होते का? हा पण शोधाचा विषय आहे. ४५० खाटांच्या जिल्हा रुग्णालयात कधी ‘फायर ड्रिल’ झाली का? हा पण शोधाचा विषय आता समोर येऊ लागला आहे.
बॉक्स
काय असते फायर ऑडिट
राज्य शासनाच्या फायर अँड सेफ्टी रुल्स अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या संबंधित यंत्रणेने स्वतःहून फायर ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. यात राज्य शासनाच्या वतीने राज्यभरात तब्बल ८०० पेक्षा जास्त एजन्सींना परवाने दिले आहेत या एजन्सीच्या मार्फत फायर ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. सदर ऑडिट हे सहा महिन्यातून एकदा होणे अपेक्षित असते मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर नगरपालिका भंडाराच्या हद्दीत येत असल्यामुळे एजन्सीकडून सदर ऑडिट केल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्रासाठी फॉर्म बी भरून नगरपालिकेत नोंदणी करायला हवी होती मात्र या संदर्भात नगरपालिकेतून एनओसी घेतलीच नाही ही बाब आता समोर आली आहे
बॉक्स
यंत्रणा कार्यान्वित नाही
जिल्हा रूग्णालयात फायर सेफ्टी हायड्रंट उपलब्ध नाही. उल्लेखनीय म्हणजे फायर स्प्रिंकलरचीही सुविधा या रुग्णालयात नसल्याची बाब आता उघडकीला आली आहे. थोडासाही धूर निघाल्यास अलार्म सिस्टम कार्यान्वित होते. अशा स्थितीत या रुग्णालयात स्मोक अलार्म ही यंत्रणाही उपलब्ध नसल्याचे दिसून आले फक्त आग लागल्यास ९० हजार व दोन लक्ष ७५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ आहे. या रुग्णालयात ४० नग ‘फायर एक्सटींग्युशरची’ सुविधा तेवढी उपलब्ध आहे जर मोठी आग लागली तर नगरपरिषदेचे एकमेव अग्निशमन वाहन तत्काळ सेवेस उपलब्ध असते. शनिवारी पहाटेही नगरपालिकेचे अग्निशमन वाहन घटनेच्या वेळी बोलविण्यात आले होते. अवघ्या सात मिनिटांच्या कालावधीत पालिकेचा अग्निशमन बंब रुग्णालय परिसरात दाखल झाला होता.