पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:06+5:302021-06-30T04:23:06+5:30
भंडारा : जिल्ह्यात २१ जूनपासून पुन्हा जोमाने लसीकरणाला प्रारंभ झाला. मात्र जानेवारी महिन्यात व त्यानंतर पहिली लस घेतलेल्या काहींना ...
भंडारा : जिल्ह्यात २१ जूनपासून पुन्हा जोमाने लसीकरणाला प्रारंभ झाला. मात्र जानेवारी महिन्यात व त्यानंतर पहिली लस घेतलेल्या काहींना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाले नाही. परिणामी दुसरा डोस घेणार कसा, असा तांत्रिक प्रश्न उपस्थित होत आहे. ही समस्या काहींबाबत असली तरी त्यांचा वेळ नाहक वाया जात आहे. याकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लक्ष १० हजार ६०४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात ३ लक्ष ५,५६८ नागरिकांनी पहिला डोस तर दुसरा डोस १ लक्ष ५,०३६ नागरिकांनी घेतली आहे. जिल्ह्यातील १४२ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. मंगळवारी म्हणजेच २९ जून रोजी दुपारी ४ वाजतापर्यंत १० हजार १३५ जणांचे लसीकरण झाले होते. मात्र यापूर्वी ज्यांनी पहिलीच घेतली त्यापैकी काहींना प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले नाही तर दुसरे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्नही अशा व्यक्तींसमोर निर्माण होत आहे. या संदर्भात मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. नंबरची लिंकिंग वेळेवर न झाल्याने किंवा ऑनलाईन माध्यमात लसीकरण ‘ॲप्रव्हूड’ न झाल्यामुळे प्रमाणपत्र तयार होत नाही. बहुदा मोबाईल नंबर योग्य किंवा चुकीचा असल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
मोबाईल नंबर कोणाचा हेच आठवत नाही
लसीकरण करताना मी स्वतःचा की अन्य दुसऱ्याचा मोबाईल नंबर दिला होता, हेच मला नीट आठवत नाही. त्यामुळे माझे प्रमाणपत्र आले नसावे, असे मला वाटत आहे. मोबाईल नंबरच आठवत नाही.
बॉक्स
लसीकरणावेळी ही घ्या काळजी
जिल्ह्यात १४२ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. लसीकरणप्रसंगी आधार नंबर तथा मोबाईल क्रमांक योग्यप्रमाणे द्यावा जेणेकरून प्रमाणपत्र तयार होताना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. तांत्रिक अडचण उद्भवल्यास तिथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांशी विचारपूस करून घ्यावी, कुठेही बाधा उत्पन्न झाल्यास त्याचे केंद्रावरच निराकरण करण्यात येत असते. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उइके म्हणाले, अशी जर तांत्रिक समस्या उद्भवत असेल तर त्यांना त्याच वेळी योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना पुढे लसीकरणाबाबत समस्या येणार नाहीत.