दैनंदिन माहिती न दिल्यास पोषण आहारावर टाच
By admin | Published: June 23, 2016 12:27 AM2016-06-23T00:27:30+5:302016-06-23T00:27:30+5:30
सर्वशिक्षा अभियानातून दररोज किती विद्यार्थ्यांना आहार दिला, त्याचा मेन्यू काय होता,...
शासनाचे आदेश : दररोज द्यावे लागणार अपडेट
भंडारा : सर्वशिक्षा अभियानातून दररोज किती विद्यार्थ्यांना आहार दिला, त्याचा मेन्यू काय होता, याची माहिती संबंधितांना आता आॅनलाईन घ्यावी लागणार आहे. ही माहिती दररोज न दिल्यास या दिवशी लाभार्थी गैरहजर समजून अनुदानास मुकावे लागणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद व अन्य शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार पुरविण्यात येतो. याबाबतची अपडेट माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शालेय पोषण आहार विभागाने काम पाहणाऱ्यांनी आॅनलाईन माहिती भरण्यासाठी संबंधित वेबसाईटवर एमडीएम पोर्टल अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एमडीएम पोर्टलसाठी लॉगआॅन करताना पोर्टलचाच पासवर्ड वापरावा लागणार आहे. त्यात शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी शिल्लक साहित्य साठा ओपनिंग बॅचच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती या प्रकारची माहिती भरावयाची आहे. १५ जूनपासून सर्व शालेय पोषण आहार दिला जाणाऱ्या सर्व शाळांनी सरल वेबसाईटमधील पोर्टलमध्ये असलेल्या एमडीएम या वेबसाईटवर क्लिक करून उपलब्ध असलेल्या फॉर्ममध्ये रोजच्या रोज वाटप केलेल्या शालेय पोषण आहाराची आणि विद्यार्थी उपस्थितीची माहिती भरायची आहे. ही माहिती भरणे सर्व शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.
किती शालेत विद्यार्थी उपस्थित आहेत. त्याच्यासाठी किती पोषण आहार शिजविला जात आहे. तांदळाबरोबर दुसरा कोणता मेन्यू देण्यात आला होता, याचीही माहिती संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांनी त्याच दिवशी आॅनलाईन भरावयाची आहे व तो अहवाल संबंधित विभागाकडे पाठवायचा आहे. त्यामुळे शाळेत किती विद्यार्थी उपस्थिती होते, यावर देखरेख ठेवली जाणार आहे. हे नियमितपणे शाळांना करावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)