चार दिवसात पाऊस झाला नाही तर हाती तणस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:46 PM2018-09-17T22:46:52+5:302018-09-17T22:47:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निसर्गाने साथ दिल्याने धानाचे पीक सुरूवातीच्या काळात जोमाने वाढले. मात्र गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. निसवलेला आणि गरर्भार अवस्थेतील भात पिकाला पावसाची नितांत गरज आहे. अशा स्थितीत आठ दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या हातात केवळ तणस राहण्याची भीती आहे.
भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळले जाते. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ७४ हजार हेक्टरवर धान पीकाची रोवणी झाली. ६ जूनपासून पऱ्हे फेकण्यात आले. त्यानंतर १४ ते ३० जूनपर्यंत ७५ टक्के रोवणीची कामे आटोपली. यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने रोवणी रखडली होती. परंतु आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. शेतशिवार हिरवेकंच झाले. पीक शेतात डौलाने वाढू लागले. सध्या उच्च प्रतिचे पीक गर्भार अवस्थेत आणि निम्न जातीचे पीक निसवले आहे. या अवस्थेत पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. परंतु गत २६ आॅगस्टपासून म्हणजेच तब्बल २० दिवसांपासून पाऊस बरसला नाही.
दररोज कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून धानपीक कोमोजून जात आहे. येत्या चार दिवसात पाऊस आला नाही तर निसवलेला धान भरणार नाही. आणि गर्भार अवस्थेतील धान लोंब्या फेकणार नाही. पावसाने असाच ताण दिल्यास शेतकºयांच्या हाती केवळ तणीस येण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे भात पिकावर रसशोसक किडींचा प्रादूर्भाव वाढत आहे. यातूनही उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र भारनियमनामुळे ओलीत करणे शक्य होत नाही.
भंडारा येथील रहिवासी रोशन उरकुडे यांची भिलेवाडा आणि लाखनी तालुक्याच्या परसोडी येथे शेती आहे. या शेतात भात पीक जोमदार आहे. उरकुडे म्हणाले, येत्या आठ दिवसात पाऊस आला नाही तर पीक हातचे जाऊ शकते. आमच्याकडे सिंचनाची सोय आहे परंतु रात्री वीज पुरवठा होत असल्याने ओलीत करणे कठीण जात आहे. अशा स्थितीत दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाढत्या इंधनाचा सिंचनावर परिणाम
भारनियमनामुळे अनेक शेतकरी डिझेल इंजिन लावून ओलीत करीत आहे. मात्र गत काही दिवसांपासून डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे डिझेल इंजिनचे भावही वाढले आहे.सध्या एका तासाला ३०० रूपये मोजावे लागतात. यातून केवळ १० गुंठे सिंचन होते. एकीकडे उत्पन्नाची हमी नाही आणि दुसरीकडे सिंचनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उत्तरा नक्षत्राकडून आशा
उत्तरा नक्षत्रात आलेला पाऊस भात पिकासाठी लाभदायक मानला जातो. ज्यावर्षी या नक्षत्रात पाऊस कोसळतो त्यावेळी उत्पन्न चांगले होते. येत्या चार-पाच दिवसात पाऊस आला तर उत्पन्न दुप्पट होवू शकते, असे शेतकरी सांगत आहे. परंतु पाऊस आला नाही तर आमच्या हाती केवळ तणीसही असे शेतकºयांनी सांगितले.
सध्या भात पीक गर्भावस्थेत आणि निसवण्याच्या अवस्थेत आहे. पाऊस लांबल्याचा परिणाम १० ते २० टक्के उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीत पिकांवर कोणत्याही किडीने आक्रमण केले नाही.
-हिंदूराव चव्हाण,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी