उत्पादनात दोष असल्यास ग्राहक मंचकडे धाव घ्या
By admin | Published: December 24, 2014 10:55 PM2014-12-24T22:55:10+5:302014-12-24T22:55:10+5:30
वस्तू अथवा सेवेत गुणदोष किंवा उत्पादन दोष असल्यास ग्राहकांनी जागरूक राहून ग्राहक मंचाकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले.
भंडारा : वस्तू अथवा सेवेत गुणदोष किंवा उत्पादन दोष असल्यास ग्राहकांनी जागरूक राहून ग्राहक मंचाकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने पोलीस कल्याण बहुउद्देशिय सभागृह येथे आज आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होत्या. उद्घाटन जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्षा गीता बडवाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक संघटनेचे वैद्यकीय प्रतिनिधी डॉ.नितीन तुरस्कर, सदस्य छाया कावळे, प्रेमराज मोहोकार, डॉ.कुकडे, राजकुमार बालपांडे, कडव, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.खोडे म्हणाल्या, अनेकदा ग्राहकांची फसवणूक होऊन सुद्धा ते ग्राहक संरक्षण कायद्याबाबत अज्ञानामुळे ग्राहक मंचाकडे दावा दाखल करीत नाहीत. म्हणून ग्राहकांनी या कायद्याबाबत माहिती करून घ्यावी. दाव्याबाबत राज्यात टोल फ्री क्र. १८००२२२२६२ ही हेल्प लाईन सुरु करण्यात आली आहे. या सेवेद्वारे ग्राहकांना मोफत सल्ला उपलब्ध करून देण्यात येतो. या सुविधांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी गीता बडवाईक म्हणाल्या, ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकोपयोगी हित जोपासण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या हिताबाबत तरतूदी नमूद आहे. ग्राहक मंचात काम करताना वेगवेगळ्या बाबींवर दावे दाखल करण्यात येतात. त्यांची तपासणी करून त्यावर निर्णय देण्यासाठी तक्रारकर्त्यांनी विस्तृत माहिती देणे आवश्यक असते. त्यात त्रुट्या असल्यास तज्ज्ञांशी विचार विमर्श करून कायद्यामधील तरतूदीनुसार निर्णय द्यावा लागतो. त्यामुळे कधी कधी निर्णय देण्यास वेळ लागतो. तसेच रिक्त पदांमुळे कामाचा व्याप वाढून आदेश पारित करण्यास विलंब लागत असतो. ग्राहक मंचात जिल्हास्तरावर २० हजार रुपयापर्यंतचे दावे दाखल करता येतात, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकात अनिल बन्सोड यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती व मार्गदर्शन करताना सुसंवाद, संघटन व संयम हा या कायद्याचा महत्वाचा हिस्सा आहे. तसेच ग्राहक संरक्षण परिषदांच्या सदस्यांनी या बाबत ग्रामीण स्तरावर जनजागृती करणे आवश्यक आहे. तेव्हाच सामान्य ग्राहकांचे हित जोपासले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी शाहीर कार्तिक मेश्राम यांनी जागो ग्राहक जागो या विषयावर कलापथक सादर करून उपस्थितांना या कायद्याबाबत माहिती करून दिली. छाया कावळे यांनी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे या कायद्याविषयी तसेच ग्राहक चळवळीच्या इतिहासाबाबत माहिती दिली. यावेळी डॉ.नितीन तुरस्कर यांचे मार्गदर्शन केले. ग्राहक दिनानिमित्त वीज वितरण कंपनी, वजन व मापे कार्यालय, नगरपरिषद, आरोग्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गॅस वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांनी प्रदर्शनी लावल्या होत्या. मान्यवरांनी प्रदर्शनीची पाहणी केली. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)