होळीसाठी वृक्ष तोडाल तर थेट कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 05:00 AM2022-03-17T05:00:00+5:302022-03-17T05:00:48+5:30

दरवर्षी परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. होळीत वृक्षांची कत्तल करून त्यांचे दहन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणही होते. याला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वृक्षपूजनाने होळी साजरी करा असे वारंवार आवाहन केल्यानंतरही वृक्षांची तोड केली जाते. मात्र, यंदा अशी वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे.

If you cut down a tree for Holi, go straight to jail | होळीसाठी वृक्ष तोडाल तर थेट कारागृहात रवानगी

होळीसाठी वृक्ष तोडाल तर थेट कारागृहात रवानगी

Next

ज्ञानेश्वर मुंदे
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात जंगलातील वृक्षांची कत्तल करून होळी पेटविली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. भंडारा येथे नव्यानेच रुजू झालेल्या उपवनसंरक्षकांनी खास आदेश काढून वृक्षतोड करणाऱ्यांची थेट कारागृहात रवानगी करण्याचे निर्देश दिले. यासोबतच आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरवर्षी परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. होळीत वृक्षांची कत्तल करून त्यांचे दहन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणही होते. याला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वृक्षपूजनाने होळी साजरी करा असे वारंवार आवाहन केल्यानंतरही वृक्षांची तोड केली जाते. मात्र, यंदा अशी वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. तसेच मालकी क्षेत्रातील वृक्षतोड करणाऱ्यांवर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश उपवनसंरक्षक गवई यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. नाकाबंदी, वाहन तपासणी करण्यात येणार असून संयुक्त वनव्यवस्थापन समितीचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे. 
कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
होळीच्या कालावधीत वृक्षतोड व शिकारीवर आळा घालण्याच्या दृष्टीने वनविभागाने योग्य नियोजन केले आहे. या कालावधीत अपवादात्मक परिस्थिती वगळून सर्व प्रकारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अधिनस्थ वनपाल, वनरक्षक, वनमजूर कर्मचाऱ्यांनी आपल्या नेमून दिलेल्या कामावर हजर राहावे. कुणी गैरहजर आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

१६२ नियतक्षेत्रात गस्त
- भंडारा जिल्ह्यात ९२७ चौरस किलोमीटरचे जंगल आहे. या जंगलाचे १० रेंजमध्ये विभाजन करण्यात आले. ३९ राऊंड आणि १६२ नियतक्षेत्र (बीट) आहेत. या सर्वच क्षेत्रात गस्त वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. होळीपूर्वी व होळीनंतर दोन ते तीन दिवस संवेदनशील क्षेत्रामध्ये गस्त घालण्याचे निर्देश दिले असून प्रादेशिक वनक्षेत्रासोबतच इतर जंगलात वाहनाद्वारे विशेषत: रात्री गस्त वाढविण्यात आली आहे.

वनविभागाची शिकाऱ्यांवर करडी नजर
-  वृक्षतोडीसोबतच धूलिवंदनाच्या दिवशी मांसाहार करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा अवैध शिकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. संवेदनशील क्षेत्रासोबतच वन्यप्राण्यांच्या शिकारी झालेल्या परिसरात ही गस्त राहणार आहे. तसेच विजेच्या प्रवाहाने शिकार झालेल्या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले.

होळी सण साधेपणाने साजरे करा : वसंत जाधव

होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी अगदी साधेपणाने साजरी करावी. जातीय सलोखा टिकवून ठेवत शांततेत सण, उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे. भंडारा जिल्ह्यात सण - उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. संशयित व्यक्ती, महिला, मुलींच्या छेडखानीचा प्रकार आढळल्यास याबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तरुणांनी अतिप्रमाणात मद्यसेवन करुन वाहन चालवू नये, असेही त्यांनी म्हटले.

होळीचा सण पर्यावरणाचा विचार करून सर्वांनी साजरा करावा. वृक्षतोड करून होळी साजरी करण्यापेक्षा वृक्ष पूजनाने होळी साजरी करावी. वृक्षतोड करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
-राहुल गवई,  उपवनसंरक्षक, भंडारा.

 

Web Title: If you cut down a tree for Holi, go straight to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.