चांगले काम केले तर त्याची नोंद होतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:38 AM2021-02-05T08:38:02+5:302021-02-05T08:38:02+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. पदक प्राप्त होण्यामागील त्यांच्या कामाचा ...
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. पदक प्राप्त होण्यामागील त्यांच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. वसंत उत्तमराव जाधव १ ऑक्टोबर २००२ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात रूजू झाले. नांदेड येथे २००४ पर्यंत ते प्रोबेशनरी डीवायएसपी होते. त्यानंतर त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून २००५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे नियुक्ती झाली. या काळात त्यांनी बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात बांगलादेशी व्यक्तींना हुडकून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी रासायनिक पदार्थांपासून दूध तयार करणारी टोळी हुडकून काढली. या कामगिरीबद्दल त्यांना यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कारही मिळाला आहे.
कोल्हापूर ते मुंबई नीती ट्रॅव्हल्समध्ये गोळीबार करून दरोडा टाकण्यात आला होता. या आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास लावून आरोपींना कारागृहात डांबले. बाभळी धरण प्रकरण त्यांनी योग्यरीत्या हाताळले. भंडारा येथे अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी मुरमाडी येथील तीन बालिकांच्या मृत्यूचे प्रकरण योग्यरीत्या हाताळले. एवढेच नाही तर २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे असताना सुरेश पुजारी टोळीचा बीमोड करीत त्यांच्यावर मोक्का लावला. याच काळात तेथे स्टेट बँकेत दरोडा पडला होता. त्याचाही छडा लावण्यात यश आले. या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपतींनी २६ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित केले आहे.
बॉक्स
माझ्या कक्षासमोर कुणी ताटकळत नाही
भंडारा जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख म्हणून आपण सूत्रे हाती घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत विश्वासाचे वातावरण निर्माण केले. आपल्याला भेटायला येणाऱ्यांसाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. कधीही कुणीही भेटू शकतो. एवढेच नाही तर कुणालाही कक्षासमोर ताटकळत राहावे लागत नाही. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न असतो, असे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.
बॉक्स
कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढली
पोलीस दलातील अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित होती. आपण रूजू होताच ही प्रकरणे प्राधान्याने निकाली काढली, असे पोलीस अधीक्षक जाधव यांनी सांगितले. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तत्काळ सोडविण्याचा आपला प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.