संविधान वाचवायचे असेल तर सत्तापरिवर्तन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:44 PM2018-05-16T22:44:47+5:302018-05-16T22:45:06+5:30
केंद्र सरकार ही जनतेच्या कसोटीवर सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. निवडणुकीपुरते खोटे आश्वासन देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ज्या राज्यघटनेवर देश चालतो ते संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : केंद्र सरकार ही जनतेच्या कसोटीवर सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. निवडणुकीपुरते खोटे आश्वासन देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ज्या राज्यघटनेवर देश चालतो ते संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वसामान्य लोकांच्या हिताचे व हक्काचे रक्षण आणि सामान अधिकार ही संविधानाची देणं आहे. आपण यावेळी सतर्क राहिले नाही तर संविधान केव्हा बदलेल, याची शाश्वती नाही. संविधान वाचवायचे असेल तर सत्ता परिवर्तन करावे लागेल. धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन झाल्याशिवाय सर्वांना अधिकार मिळणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
वरठी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी, धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा भुरे, हरिभाऊ भाजीपाले, कल्याणी भुरे, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे, संगीता सुखानी व राजू कारेमोरे उपस्थित होते.
यावेळी खा.प्रफुल पटेल म्हणाले, भाजपचे सरकार हे खोटारडे सरकार असल्याचे उदाहरणे दिली. सामान्य लोकांच्या खिशाला हात घालणारे हे सरकार असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने सामान्य लोकांच्या कल्याणकारी योजना बंद करून नोकरी व व्यवसाय डबघाईस नेला. चुकीच्या धोरणामुळे उद्यागधंदे बंद झाल्याचा आरोपही त्यांनी केला.