पालेभाजी खायची आहे तर... भंडारा जिल्ह्यातील पालांदूरला या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 07:00 AM2022-03-22T07:00:00+5:302022-03-22T07:00:12+5:30
Bhandara News भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे पालेभाज्यांचे हिरवेगार मळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या परिसरातील कोणत्याही समारंभात पालेभाजी ही हमखास केली जाते आहे.
मुखरू बागडे
भंडारा : ऋतुमानानुसार मनुष्याच्या आहारातील चवी बदलतात. उन्हाळा सुरू झाला आहे. पालेभाज्यांची मोठी मागणी वाढत आहे. लग्न समारंभात तर हटकून पालेभाजीची नितांत गरज आहे. दैनंदिन परिवारातही पालेभाज्यांना मोठी मागणी आहे. पालेभाज्या पालांदूरला हटकून मिळतात. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे मोठे मळे खवय्यांना भुरळ घालत आहेत. तेव्हा पालेभाजी खायची असेल तर... पालांदूरला नक्कीच या ! असा संदेश पालेभाजी खवय्यांना पालांदूर देत आहे.
चुलबंद खोऱ्यात पालांदूर हे भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग घेत पालांदूर व परिसरात सर्वच प्रकारच्या भाज्यांचे मळे फुलले आहेत. कारले, लवकी, वांगे, टोमॅटो, भेंडी यासारख्या भाज्यांसोबत पालेभाज्यांत पालक, लाल चवळी, हिरवी चवळी, मेथी, राजगिरा, लाल भाजी, घोर भाजी आदी पालेभाज्या अगदी ताज्या टवटवीत स्थानिक बाजारात व बागायतदारांकडे दिवसभर विक्रीला उपलब्ध आहेत.
कमी पाण्याची बागायत शेती
दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा सगळीकडेच जाणवत आहे. इस्त्राईल सारख्या देशात प्रगत झालेली ठिंबक सिंचन योजना आपल्या देशात आली असून पालांदूर येथील अनेक शेतकरी कमी पाण्याच्या वापराकरिता ठिंबक सिंचन वापर करीत आहेत. त्यामुळे कमी पाण्यात व्यवस्थित बागायतीचे मळे फुलले असून बागायतदार कमी पाण्यात पालेभाज्यांचे मळे फुलवित आहेत.
राजगिऱ्याचे घरचेच बियाणे
कमी खर्चाची शेती म्हणून पालेभाजीची शेती पुढे आलेली आहे. घरीच उत्पादित केलेले राजगिऱ्याचे बियाणे सांभाळून राजगिरा भाजीचे उत्पन्न घेतले जाते. पालांदूर येथे निवासी राहून बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित झालेले बरेच खवय्ये भाजीपाल्याच्या दृष्टीने पालांदूर कायमस्वरूपी आठवणीत ठेवतात. १० ते १५ रुपये किलोने नेहमी विकणारा राजगिरा सर्वांनाच आवडीचा ठरत आहे.