लाखनीच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: April 15, 2015 12:42 AM2015-04-15T00:42:30+5:302015-04-15T00:42:30+5:30
लाखनी येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहेत.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : लाखनीवासीयांचे तहसीलदारांना निवेदन
भंडारा : लाखनी येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहेत. पाणी, स्वच्छता यासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. समस्या सोडविण्यात याव्यात, या आशयाचे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी समस्यांचे निवेदन तहसिलदारांना दिले.
लाखनी ग्रामपंचायतीचे लाखनी नगर पंचायतीत रूपांतर झाले. ज्याचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. परंतु त्याचसोबत लाखनी नगरपंचायत समस्यांचे माहेरघर बनत चालली आहे.
लाखनी ग्रामपंचायतीत कामावर असणाऱ्या सफाई कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. ज्यामुळे आज जवळपास दोन महिन्यांपासून लाखनी गावात नाल्यांची साफ सफाई झालेली नाही. सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य आहे. नाल्या तुडूंब भरून नाल्यांचा पाणी रस्त्यावर वाहत आहे. ज्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येवून विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे सायंकाळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो ज्यामुळे विशेषत: महिला व मुली भययुक्त वातावरणात वावरत आहेत. अनेक निर्जनस्थळी अंधार असल्यामुळे महिलांनी तेथून जाणे येणे बंद केलेले आहे. गावातील बोरवेल बंद असल्यामुळे महिलांना दूर दूरपर्यंत पिण्याच्या पाण्याकरीता भटकंती करावी लागत आहे. दिवसभर काबाडकष्ट करून घरी येणाऱ्या महिलांना दूरवर जावून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शासकीय कामांसाठी लोकांना विविध दाखल्यांची आवश्यकता लागत आहे. परंतु कार्यालयात प्रशासक असल्यामुळे प्रत्येक दाखल्यांसाठी अर्ज मागत आहेत. इतकेच नव्हे तर ज्या दाखल्यांकरीता अर्जाची आवश्यकता नाही. रेकॉर्ड पाहूनही दाखले दिले जाऊ शकतात. अशा दाखल्यांकरीताही अर्ज मागविले जातात. अर्ज दिल्यानंतर २-३ दिवस लोकांना दाखले मिळत नाहीत. त्यामुळे लोकांना नगर पंचायत कार्यालयाच्या २-३ दिवस वारंवार चकरा माराव्या लागत आहेत तरीही लोकांची कामे पूर्ण होत नाहीत. काही कर्मचारी परस्पर पैशाची देवाण घेवाण करून तात्काळ दाखले उपलब्ध करून देत आहेत.
नगर पंचायतच्या गलथान व नियोजनशुन्य कारभारामुळे मागील २ महिन्यांपासून लाखनी गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागण्या त्वरीत मंजूर करण्यात याव्यात अन्यथा तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. सर्व सफाई कामगारांना पूर्ववत कामावर बोलावण्यात यावे, बंद असलेले पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात यावे, बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी, साधा अर्ज घेवून त्वरीत दाखले देण्यात यावे, कार्यालयात लागणारे सर्व साहित्य कर्मचाऱ्यांना त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)