ऑनलाइन शिक्षणाने मुलांच्या शारीरिक विकासाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:28+5:302021-09-05T04:39:28+5:30
वाकेश्वर : कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण शासकीय स्तरावरून सुरू करण्यात आले. शिक्षकांचे वर्गातील ...
वाकेश्वर : कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण शासकीय स्तरावरून सुरू करण्यात आले. शिक्षकांचे वर्गातील अध्यापन आणि ऑनलाइन अध्यापन यात खूप फरक आहे. ऑनलाइन अध्यापनात ती परिणामकारकता दिसून येत नाही, तरीही आपण ही पाश्चिमात्य व्यवस्था परिस्थितीनुरूप स्वीकारली आहे. मागिल दीड वर्षापासून अव्याहतपणे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्याचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिकतेवर होत आहेत. पालकांनी सजगतेने विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
विद्यार्थी दररोज एकाच जागी चार ते पाच तास बसून ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. त्यांच्यात शारीरिक व मानसिक व्याधी निर्माण होत आहेत. मोबाइलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांची दृष्टी क्षीण होत आहे. त्यांच्यात एकलकोंडा व चिडचिडेपणा वाढत चाललेला आहे. चार ते पाच तास त्यांच्या शारीरिक हालचाली होत नसल्याने शारीरिक विकास खुंटत चाललेला आहे. अलीकडे विद्यार्थ्यांच्या जेवणातील वेळेतही बदल होत आहे.
कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांचे खेळणे थांबले. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील शनिवारची कवायत थांबलेली आहे.
कोट
ऑनलाइन शिक्षणाने विद्यार्थी तासनतास एकाच ठिकाणी बसून राहत असल्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज सकाळी एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे.
- डी. बी. टेकाम, क्रीडा शिक्षक.
कोट
लहान मुलांचा विकास, त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव, कोरोना संकटकाळ व ऑनलाइन शिक्षणाच्या मानसिक दडपणातून बाहेर पडण्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणे हितगूज करणे, सुसंवाद साधणे गरजेचे आहे.
- अनिल बारई, शिक्षक