अडयाळ येथे आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:02+5:302021-06-19T04:24:02+5:30
फोटो अडयाळ : भंडारा पवनी महामार्गाचे बांधकाम व महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुरू असलेल्या नालीच्या अपुऱ्या बांधकामामुळे अडयाळ ग्रामवासी तथा ...
फोटो
अडयाळ : भंडारा पवनी महामार्गाचे बांधकाम व महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुरू असलेल्या नालीच्या अपुऱ्या बांधकामामुळे अडयाळ ग्रामवासी तथा अशोक नगरवासीयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याहीपेक्षा आरोग्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असतानाही यासाठी प्रशासनाची काहीच हालचाल होताना दिसत नाही. यासाठी काही प्रयत्न न केल्यास भविष्यात बिकट परिस्थिती येऊ शकते. सध्या अडयाळ गावातील दुर्गंधीयुक्त पाणी हमीद प्लॉटवाले यांच्या घरासमोरच्या भागात तथा येथून जवळच असलेल्या राजेंद्र ब्राह्मणकर यांच्या घराजवळ कित्येक दिवसांपासून हे दुर्गंधीयुक्त पाणी साचून आहे. मात्र पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा नसल्यामुळे पाणी अशोक नगरातच मुरत आहे.
सध्या मान्सून जोर धरत आहे. लगातार पावसाची संततधार येताच पाणी अशोक नगरातच मुरते. थांबून राहते. यासाठी तत्काळ येथे पाण्याचा मार्ग मोकळा होणे गरजेचे आहे. यासाठी कंत्राटदार तथा ग्रामपंचायत प्रशासन दोघेही बघ्याची भूमिका घेत असल्याने आता ग्रामस्थ संतापले आहेत. याआधी अशोक नगरवासीयांनी नगरातील परिसरात वाढणाऱ्या व्यवसाय विरोधात आवाज उठविला होता. पण त्यावर अद्याप काेणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. बैठक झाल्या पण निर्णय झाला नाही. आता तर दुर्गंधीयुक्त पाण्याची समस्या नगरात जोर धरू लागली आहे. यावर तत्काळ संबंधित विभागाने ही समस्या सोडवत अशोक नगरवासीयांनी दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.