सीमांकनाबाहेरील रेतीचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:17 PM2017-12-01T22:17:22+5:302017-12-01T22:17:56+5:30
मुंढरी रेतीघाटाचे सिमांकन झाले असतानाही रेतीच्या उपस्यामुळे सिमांकनातील रेती संपलेली आहे.
लोकमत आॅनलाईन
करडी (पालोरा) : मुंढरी रेतीघाटाचे सिमांकन झाले असतानाही रेतीच्या उपस्यामुळे सिमांकनातील रेती संपलेली आहे. त्यामुळे अधिक नफा कमविण्यासाठी सिमांकनाबाहेरील रेतीचा उपसा घाटमालकांनी चालविला आहे. रेती काढण्यासाठी कृषक ट्रॅक्टरचा वापर होत आहे. मुंढरी रस्ता करारनाम्यात प्रस्तावित असताना कान्हळगाव हद्दीचा, स्मशानभूमिचा रस्त्याच्या वाहतुकीसाठी गैरवापर केला जात आहे. महसूल प्रशासन गंभीर दिसत नाही. उलट ग्रामस्थांना भयभित करण्यासाठी पोलीस विभागाने कारवाईचे नोटीस पाठविले असून थेट चौकशी व कारवाईची मागणी आहे.
मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे. यामुळे गावाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीची व ग्रामसभेतून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे गावाचे व पर्यावणाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीची वा ग्रामसभेतून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. गावचे हित जोपासण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना सुद्धा रेतीघाट मालक व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरप्रकार सुरू आहे. प्रकरणी कारवाई करण्यासाठी ३० नोव्हेंबरपासून माजी जि.प. सदस्य के.बी. चौरागडे यांच्या नेतृत्वात धनराज भोयर, राम कुकडे, दादाराम भोयर व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे.
सीमांकनाबाहेर रेतीचा उपसा होत असल्यास नायब तहसीलदार यांच्याकडून चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळून आल्यास वरिष्ठ स्तरावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला जाईल. मात्र, सीमांकनाबाहेरील उपस्याची माहिती उपोषणकर्त्यांनी त्यांच्या निवेदनातून दिलेली नाही. त्यांचे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आलेले असून फक्त प्रतिलिपी पाठविलेल्या आहेत.
-सूर्यकांत पाटील, तहसीलदार मोहाडी.