कोच्छी, दांडेगाव येथे अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:27+5:302021-05-19T04:36:27+5:30
तालुक्यातील राजनी ते ओपारा परिसरातील कालव्याचे बांध बनविणे सुरू आहे. त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाअंतर्गत तालुक्यातील कोच्छी (दांडेगाव) जंगल क्षेत्रातील ...
तालुक्यातील राजनी ते ओपारा परिसरातील कालव्याचे बांध बनविणे सुरू आहे. त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाअंतर्गत तालुक्यातील कोच्छी (दांडेगाव) जंगल क्षेत्रातील बाला देसाई नामक शेतकऱ्याच्या गट क्रमांक १०७ च्या जमिनीतून २०० ब्रॉस मुरुम उत्खननाची परवानगी देण्यात आली.
सदर मंजुरी अंबिका कन्स्ट्रक्सन कंपनीला दिले गेले. त्यानुसार १३ मे ते २१ मेपर्यंत एकूण २०० ब्रॉस मुरुमाचे उत्खनन करून परिवहनास परवानगी देण्यात आली. मात्र या प्रकरणात जिल्हा खनिकर्म विभाग व तालुका महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षिततेचा फायदा घेत कंपनीद्वारे मंजूर गट क्रमांकातील जमिनीऐवजी अन्य ठिकाणाहून गत चार दिवसांपासून बिनधास्तपणे मुरुमाचे उत्खनन करून परिवहन केले जात आहे.
दरम्यान, गत चार दिवसांपासून नहराच्या बांधकामासाठी बेकायदेशीररीत्या मुरुमाचे उत्खनन करुन परिवहन केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्याचा आरोप नागरिकांत केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा खनिकर्म विभागासह स्थानिक तालुका महसूल प्रशासनाने तत्काळ दखल घेत मंजूर गटाऐवजी अन्य गट क्रमांकाच्या जमिनीतून अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन व परिवहन करणाऱ्या दोषी कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
बॉक्स
चौकशी करून कारवाई करणार
तालुक्यातील कोच्छी (दांडेगाव) परिसरातील शेतजमिनीत मुरूम उत्खनन व परिवहनाची शासनाने परवानगी दिली असताना संबंधित शेतजमिनीऐवजी अन्य जमिनीतून मुरूम उत्खनन व परिवहन केले जात असल्याप्रकरणी येथील तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांना विचारले असता चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.