पोवारटोली घाटावर रेतीचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:51 AM2019-05-25T00:51:58+5:302019-05-25T00:52:21+5:30
तालुक्यातील पवारटोली (परसोडी) घाटातून रेतीचे अवैध उत्खनन केले जात असून डंम्पींग केलेली रेती टिप्परच्या माध्यमातून नागपूरसह इतर ठिकाणी पाठविली जात आहे. याप्रकाराला महसूल विभागाचे पाठबळ असून शासनाचा लाखोंचा महसूल मात्र बुडत आहे.
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यातील पवारटोली (परसोडी) घाटातून रेतीचे अवैध उत्खनन केले जात असून डंम्पींग केलेली रेती टिप्परच्या माध्यमातून नागपूरसह इतर ठिकाणी पाठविली जात आहे. याप्रकाराला महसूल विभागाचे पाठबळ असून शासनाचा लाखोंचा महसूल मात्र बुडत आहे.
साकोली तालुक्यातील दोन रेतीघाटांचे लिलाव मार्च महिन्यात करण्यात आले होते. शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे रेतीघाट उत्खननासाठी खुले करण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही रेतीघाट बंद करण्याचे निर्देश दिले. शासकीय यंत्रणेनुसार कागदोपत्री हे दोनही रेतीघाट बंद असले तरी प्रत्यक्षात मात्र अहोरात्र रेतीचे उत्खनन सुरू आहे. या रेतीघाटावरून दररोज हजारो ब्रास रेतीचे खनन केले जातो. पहाटेपर्यंत रेतीचे खणण करून त्याचे घाट परिसरात डम्पींग केल्या जाते. त्यानंतर टिप्परच्या माध्यमातून त्याची वाहतूक केली जाते. दोनही रेतीघाट साकोली तहसील कार्यालयापासून अगदी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. मात्र रेतीतस्करांचा कोणताही अडतर होत नाही. खुलेआम रेतीची वाहतूक केली जाते. या सर्वप्रकारात शासनाचा महसूल बुडत आहे. परसोडी गावासाठी स्वतंत्र तलाठी आहे. मात्र हा तलाठी खुलेआम रेतीस्तकरी होत असताना करतो काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जेसीबीने खनन, टिप्परने वाहतूक
परसोडी येथील रेतीघाटातून दररोज जेसीबीद्वारे रेतीचे खनन केले जातो. ट्रॅक्टरच्या सहायाने घाट परिसरात त्याचे डम्पींग केले जाते. डम्पींग केलेली रेती पुन्हा जेसीबीच्या सहायाने टिप्परमध्ये भरून ती भंडारा, लाखनी आणि गोंदिया या जिल्ह्यासह नागपूरला पाठविली जाते. या परिसरात ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे दिसून येतात.