नरव्हा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:00 AM2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:11+5:30
दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरु असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातूनच रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने लहान मुलं रस्त्यावर खेळत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी एका बालकाचा रस्त्यावर अपघात रेती तस्करीतून झाला होता. त्यानंतरही वाहतूक सुरुच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील नरव्हा रेती घाटावर ट्रॅक्टरच्या आधाराने रेती उपसा व वाहतूक सुरू आहे. रेती उपसा बंद करावा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा नरव्हा वासियांनी प्रशासनाला दिला आहे.
दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरु असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातूनच रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने लहान मुलं रस्त्यावर खेळत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी एका बालकाचा रस्त्यावर अपघात रेती तस्करीतून झाला होता. त्यानंतरही वाहतूक सुरुच आहे.
मुरमाडी व पालांदूर परीसरातील रेती तस्कर पूर ओसल्यापासून नरव्हा , मऱ्हेगाव पाथरी, पळसगाव, दिघोरी घाटावर सक्रिय झालेले आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या रेती वाहनाने गावकऱ्यांची झोप कठीण झाली आहे. रेती तस्करांची संबंध लांब पर्यंत असल्याने प्रशासन सुद्धा त्यांचे वर कारवाई करण्याकरिता मागेपुढे पाहत आहेत.
दिवसभर होत असलेली रेती वाहतूक ही चिंतेची बाब असून उन्हाळ्यामध्ये काठावरील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात आलेल्या पुराने नदीपात्र रेतीने भरून होते. मात्र रेती तस्करांनी अवैध रेती वहन मोठ्या प्रमाणात चालविल्याने आतापासूनच नदीपात्र मोकळे होत आहेत. कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, खनिकर्म विभाग आदींनी वेळीच लक्ष घालत अवैध रेतीला प्रतिबंध घालावा अशी मागणी नदी तीरावरील गावकऱ्यांनी केलेली आहे.
जिल्ह्यात अजून तरी रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. तेव्हा शासनाच्या वतीने पुढाकार घेत पर्यावरण विभागाची परवानगी घेत तात्काळ नदीकाठावरील गावकऱ्यांना विश्वासात घेत नदीघाट लिलावात काढावे अशी मागणी होत आहे. काही हिस्सा गावच्या सुधारणेसाठी देत गावातील रस्त्याची दुरावस्था सुधारावे, पिण्याच्या पाण्याकरिता विशेष व्यवस्था म्हणून शक्य ते प्रयत्न करीत नदीकाठावरील नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे.