साकोलीत अवैध रेती तस्करी सुरुच
By admin | Published: April 20, 2017 12:46 AM2017-04-20T00:46:28+5:302017-04-20T00:46:28+5:30
जिल्ह्यात अवैध रेतीतस्करी रोखण्यात प्रशासनाची धडक मोहीम सुरु असली तरी साकोली तालुक्यात मात्र अवैध रेती चोरांना अभय मिळत आहे.
तहसीलदारांचे दुर्लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
संजय साठवणे साकोली
जिल्ह्यात अवैध रेतीतस्करी रोखण्यात प्रशासनाची धडक मोहीम सुरु असली तरी साकोली तालुक्यात मात्र अवैध रेती चोरांना अभय मिळत आहे. त्यामुळे रात्री दिवसा खुलेआम रेतीचोरी सुरु असून शासनाला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अवैध रेती उत्खनन तात्काळ थांबवा, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला साकोली तालुक्यात केराची टोपली दाखविण्यात येत आहे.
साकोली तालुक्यातील परसोडी, पोवारटोली व एक असे एकुण तीनच रेतीघाट लिलाव झाले आहेत.
या रेती घाटावरूनही रॉयल्टी एवढी टोकनवर रेती आणली जाते. तर उर्वरीत महालगाव, लवारी, उमरी, धर्मापुरी, गोंडउमरी, मोहघाटा या रेतीघाटावरून अवैधरित्या रेती खोदली जात आहे.
या रेतीचोरीच्या अनेक तक्रारी तहसील कार्यालयात केल्या जातात. मात्र एक दिवस कार्यवाहीनंतर दुसऱ्या दिवशी मात्र मैदान पुन्हा मोकळे सोडले जातात. त्यामुळे रेतीतस्कर रात्रंदिवस रेतीचोरी करीत आहेत.
चौकी स्थापनच झाली नाही
ज्या घाटांचे लिलाव झाले नाही अशा रेतीघाटावर महसूल विभागामार्फत चौकी बसविण्यात यावी, अशी मागणी केल्यानंतरही तहसील विभागामार्फत चौकी बसविण्यात आली नाही. त्यामुळे या अवैध रेती चोरीला तहसील कार्यालयाची मुक संमती आहे हे स्पष्ट आहे.
दिवसभर गस्त नाही
साकोली तालुक्यात दिवसा व रात्री फिरते पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यात मंडळ अधिकारी, तलाठी व पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे फिरते पथक दिवसा व रात्री फिरतानी दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी.
संबंधित तलाठ्यांवर कारवाई करा
ज्या रेतीघाटावरून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे. त्या घाटापासून किती रेती चोरी करण्यात आली. याची तपासणी करून जेवढी रेती चोरी झाली त्या रेतीची किंमत संबंधित तलाठ्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गिट्टी व मुरुमाचे अवैध खनन
तालुक्यात रेतीप्रमाणेच गिट्टी व मुरुमाचेही अवैध खनन सुरु आहे. बिना रॉयल्टी मुरुम व गिट्टीचे उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. याचीही चौकशी करण्यात यावी.