रामपुरात भरतो जनावरांचा अवैध बाजार
By Admin | Published: June 6, 2017 12:25 AM2017-06-06T00:25:13+5:302017-06-06T00:25:13+5:30
सध्या देशात बैलांसह गायींची खरेदी विक्री करून हत्या करण्यावर निर्बंध लागले आहे.
प्रशासन मूग गिळून : कामठी येथे कत्तलखान्याकडे जनावरांची रवानगी, दलालाचे मोठे रॅकेट सक्रिय
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सध्या देशात बैलांसह गायींची खरेदी विक्री करून हत्या करण्यावर निर्बंध लागले आहे. परंतु तुमसर तालुक्यातील रामपूर (आंबागड) येथील बाजारात नियमबाह्य जनावरांची खरेदी विक्री सुरु आहे. ही जनावरे राजरोसपणे कत्तलखान्याकडे नेली जात आहेत. जंगलव्याप्त गावात सदर बाजार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे हे विशेष.
तुमसर तालुक्यात केवळ तुमसर शहर तथा सिहोरा येथेच गुरांचा बाजार भरतो. रामपूर येथे गुरांचा बाजार भरविण्याची शासनाची परवानगी नाही. ग्रामस्थांनीही येथे विरोध केला असून ग्रामपंचायतीत येथे परवानगी नाही अशी माहिती आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून राजरोसपणे आठवडी बाजाराच्या दिवशी मोठा जनावरांचा येथे बाजार भरत आहे. जनावरांची कत्तलखान्याकडे रवानगी होते. विशेषत: ही सर्व जनावरे कामठी येथे नेली जातात अशी माहिती आहे.
रामपूर हे गाव सातपुडा पर्वत रांगात असून जंगलव्याप्त परिसरात आहे. प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. दुर्लक्षाची कारणे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनावरांना वाहून नेणाऱ्या वाहनांच्या रांगा येथे लागल्या असतात. जंगल मार्गाने वाहने कामठी येथे जातात. जनावरांची खरेदी विक्री करणारे येथे दलाल सक्रीय आहेत. मध्यप्रदेशातूनही येथे जनावरे आणली जात आहेत. शेतीला उपयोगी जनावरे विक्रीला येत नाही अशी माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यांने ‘लोकमत’ला दिली.
खरेदी विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट येथे असल्याचे सामान्य विक्रेता येण्यास धजावत नाही. प्रशासनाला हे सर्व माहित आहे. परंतु येथे कारवाई झाली नाही. बैल बाजारात दलालांची व खरेदीदारांची गर्दी येथे पाहायला मिळते. प्रशासनाने या दलालांपुढे नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.
अवैध भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर येथे कारवाई करण्याची गरज आहे. गोरक्षण कार्यकर्त्यांचे मौन हा येथे संशोधनाचा विषय आहे. या बाजाराला कुणाचा आशीर्वाद आहे हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो.