लवारी घाटातून रेतीचे अवैध खनन
By admin | Published: March 29, 2017 12:41 AM2017-03-29T00:41:10+5:302017-03-29T00:41:10+5:30
तालुक्यातील लवारी रेतीघाटावरून दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असून शासनाच्या तिजोरीला लाखो रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे.
महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष : साकोली तालुक्यातील प्रकार
साकोली : तालुक्यातील लवारी रेतीघाटावरून दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असून शासनाच्या तिजोरीला लाखो रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र याकडे महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष आहे.
साकोली तालुक्यात फक्त तीन रेतीघाटाचे लिलाव झाले असून या तीनही रेतीघाटावरून विना रॉयल्टी रेतीचे अवैध खनन सुरू आहे तर या रेतीघाटावरून टोकनचे पैसे वाचावे यासाठी रेती माफिया अवैध मार्गाचा वापर करीत तालुक्यातील धर्मापुरी व लवारी या रेतीघाटावरून रात्री व पहाटे अवैधरित्या रेती उत्खनन करीत आहेत. या रेतीघाटावरून दररोज हजारो ब्रास रेतीचे उत्खनन होत आहे. हे खनन राजरोसपणे सुरू असताना देखील संबंधित विभाग शांत कसे काय, असा प्रश्न आह ेव कधी काळी महसूल विभागाने ट्रॅक्टर पकडले तरीही दंड वसुल ट्रॅक्टर सोडून दिले जातात. परिणामी तस्कराची हिम्मत वाढते जर या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली तर या अवैध व्यवसायावर काही प्रमाणात आळा बसू शकतो तर रेती घाटावरूनही विना रॉयल्टी टोकणवर ट्रॅक्टर सोडले जातात याचीही चौकशी झाली पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)
रेतीसाठ्याची चौकशी करण्याची मागणी
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी रेतीचे अवैध साठे तयार करून ठेवण्यात आले आहेत. ही रेतीसाठे अवैध असून यावर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
साकोली तालुक्यातील रेतीमाफियांचे महसूल व पोलीस प्रशासनाशी असलेले संंबंध व पैशाची देवाणघेवाण यामुळे तालुक्यात अवैध रेती खनन राजरोसपणे सुरू आहे. आज सकाळी लवारी रेतीघाटावर पोलिसांना दोन ट्रॅक्टर पकडले व चिरीमिरी घेऊन कारवाई न करताच ट्रॅक्टर सोडून दिले.